खाद्य तेलाचे भाव वधारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:54 PM2019-11-10T12:54:18+5:302019-11-10T12:54:44+5:30

पंधरवड्याच्या आत तेलात ३ रुपयांची वाढ होत ते ८२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

Edible oil prices rise! | खाद्य तेलाचे भाव वधारले!

खाद्य तेलाचे भाव वधारले!

Next

- संजय खांडेकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशात ओल्या दुष्काळाचे सावट असल्याने तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा परिणाम आता प्रत्यक्ष जाणवत असून, खाद्य तेल प्रतिकिलो मागे ३ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील फोडणी महागली आहे. वधारत असलेले खाद्य तेलाचे भाव जर आटोक्यात ठेवायचे असेल, तर खाद्य तेलापेक्षा भारताने तेलबियांची आयात करावी, अशी सूचनावजा मागणी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट)चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा देशांतर्गत सर्वच पिकांची नासाडी झाली असून, सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या तेल उत्पादक राज्यातील स्थिती अत्यंत केविलवाणी आहे. कापूस आणि सोयाबीनचा पेरा दोन्ही राज्यांत जास्त असतो. दोन्ही तेलबियांतून मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची विक्री होते; मात्र दोन्ही राज्य पीछाडीवर पडल्याने आता तेलाचे भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दरम्यान सोयाबीनच्या खाद्य तेलाचे भाव ७९ रुपये प्रतिकिलो होते. पंधरवड्याच्या आत तेलात ३ रुपयांची वाढ होत ते ८२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. ही वाढ पुढच्या तीन ते चार महिन्यांत आणखी दोन ते तीन रुपयांनी वधारण्याचे संकेत मिळत आहेत. तेल उत्पादनात आधीच आपला देश मागे असतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करावी लागते.
यंदा त्याहूनही जास्त प्रमाणात आयात करण्याची वेळ येणार आहे, असे चित्र दिसत आहे. त्यावर पर्याय म्हणून ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी यंदा खाद्य तेलाऐवजी तेलबियांची आयात करण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला आहे. तेलबियांच्या आयातीसोबतच तेल निर्मिती करणाऱ्यासाठी काही योजना शासनाने जाहीर कराव्यात आणि आॅइल इंडस्ट्रीजला उभारी द्यावी, असेही डालमिया यांनी सुचविले आहे. त्यावर शासन धोरण काय ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Edible oil prices rise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.