सोयाबीनच्या आवकअभावी ५ ते ८ रुपयांनी वधारले खाद्यतेलाचे भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 02:55 PM2019-12-13T14:55:02+5:302019-12-13T14:55:21+5:30
आगामी आठ दिवसांत आणखी तीन रुपयांची भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे.
- संजय खांडेकर
अकोला : गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि इतर तेलबिया वाणाची आवक कमी असल्याने पंधरा दिवसांत तब्बल ५ ते ८ रुपयांनी खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. भाववाढीचा हा आलेख कायम राहणार असून, आगामी आठ दिवसांत आणखी तीन रुपयांची भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. उशिराने आलेल्या अतिवृष्टीचा फटका आता सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे.
दरवर्षी भारतीयांना जेवढे खाद्यतेल लागते, त्यातील ७० टक्के खाद्यतेल आयात होते. देशात केवळ ३० टक्के खाद्यतेल निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या तेलात सोयाबीन आणि पामचा समावेश आहे. देशात सोयाबीनचा पेरा जास्त असला तरी सोयाबीनवर प्रक्रिया करून खाद्यतेल काढणारे उद्योग कमी आहेत. त्यातही यंदा उशिरा अन् अतिशय पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले आहे. काही प्रमाणात सोयाबीन आले; मात्र त्यात दर्जा राहिलेला नाही. त्यामुळे ४,००० रुपये प्रतिक्विंटलच्या पलीकडे सोयाबीनला भाव नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती, एनसीडीईएक्स आणि खासगी व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची आवक सुरूच असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ही आवक अत्यल्प आहे. सोयाबीनच्या आवकअभावी आता खाद्यतेलाचे भाव वधारत आहेत.
असे झाले भाव...
खाद्यतेलाच्या दराचा आलेख सातत्याने उंचावर सरकत जात आहे. पाम तेलामध्ये प्रतिकिलो मागे सात रुपये, वनस्पती तेलामध्ये प्रतिकिलो मागे सहा रुपये आणि सोयाबीन तेलामध्ये प्रतिकिलो मागे आठ रुपये वाढले आहेत. येत्या आठ दिवसांत आणखी तीन रुपयांनी ही भाववाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या धोरणाकडे लक्ष
खाद्यतेलाची आयात करण्याऐवजी यंदा तेलबियांची आयात करण्याचे सरकारचे धोरण ठरत आहे. देशातील जवळपास ४०० उद्योजकांना तेल निर्मितीसोबतच अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. असे जर झाले तर खाद्यतेलाचे भाव आटोक्यात राहण्याची शक्यता आहे.
सोयाबीन उत्पादनाचा फटका यंदा सर्वांनाच जाणवणार आहे. विदेशात सोयाबीन आणि डीओसीचे भाव आटोक्यात असल्याने तरी भाव ठीक आहे. जर विदेशात सोयाबीनचे भाव वधारले, तर यापेक्षा जास्त दराने खाद्यतेल विकत घेण्याची वेळ येऊ शकते.
-वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.