यशस्वी होण्यासाठी शिक्षण हाच मूळ पाया- ठाकरे
By admin | Published: August 1, 2015 12:30 AM2015-08-01T00:30:36+5:302015-08-01T00:30:36+5:30
माळी महासंघाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.
अकोला: जीवन जगणे ही एक कला आहे आणि ती यशस्वी करायची असेल, तर शिक्षण हाच मूळ पाया आहे. पालकांनी मुलांना मोठी स्वप्न पहायला शिकवावी व ती कशी पूर्ण करावी हे सांगावे, असे मत अखिल भारतीय माळी महासंघाद्वारे आयोजित विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळय़ाप्रसंगी अध्यक्षस्थानी असलेले अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी प्रमिलाताई ओक सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला माजी आमदार तुकाराम बिरकड, आमदार बळीराम सिरस्कार, महेश गणगणे, जयवंतराव मसने, प्रकाश तायडे, प्रा. संतोष हुसे, धर्मदाय आयुक्त अँड. किशोर मसने, डॉ. राधेश्याम बाहादुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, किशोर बळी, स्मिता परोपटे, रोहिणी तडस, मनोहरराव चरपे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष सुभाष सातव यांनी केले. संचालन राजेश जावरकर, उज्ज्वला रहाटे, वनिता उंबरकर, गणेश काळपांडे यांनी केले. याप्रसंगी प्रदीप काळे, मंगेश म्हैसने, मनोहर गिर्हे, नरेश सम्रीतकर, तुळशीराम इटोले, संजय वानखडे, नितीन देऊळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.