शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आता दरमहा होणार शिक्षण परिषद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:29 PM2018-08-21T13:29:46+5:302018-08-21T13:35:51+5:30
अकोला : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाने सातत्याने प्रयोग सुरू केले आहेत. त्यापैकी एक प्रयोग शिक्षण परिषद हा आहे. आता दरमहा शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे.
अकोला : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाने सातत्याने प्रयोग सुरू केले आहेत. त्यापैकी एक प्रयोग शिक्षण परिषद हा आहे. आता दरमहा शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेंतर्गत शिक्षण परिषद घेतल्या जाणार आहेत. समूह साधन केंद्र स्तरावर प्राथमिक व माध्यमिकचे मुख्याध्यापक, शिक्षकांना शिक्षण परिषदेला उपस्थिती बंधनकारक केली आहे.
शाळांमधील शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, या दृष्टिकोनातून प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि इयत्ता ५ वी ते ८ वी वर्गांचे शिक्षक, माध्यमिक इयत्ता ९ वी व १0 वी वर्गांचे सर्व विषय शिक्षकांसाठी दरमहा शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे. या शिक्षण परिषदेवर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, उप शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण राहणार आहे. शिक्षण परिषद झाल्यानंतर दोन दिवसांनी संबंधित मुख्याध्यापकांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडे अहवाल पाठवावा लागणार आहे. शिक्षण परिषदेमध्ये इ. ३, ५ व ८ वी एनएएस रिपोर्ट, अध्ययन स्तर निश्चिती आढावा, दीक्षा, मित्र, सरल याबाबत मार्गदर्शन, भाषा, मूलभूत वाचन विकास व गणितसंबोध विकास याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीच्या दृष्टिकोनातून तयारी, स्पोकन इंग्लिश ई टीच आढावा, केआरए व शाळासिद्धी आढावा, किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन, प्रगत शाळांच्या यशोगाथा व नावीन्यपूर्ण उपक्रम, मदर स्कूल, प्रक्रिया अहवाल यासह गणित, विज्ञान व इंग्रजी डेमो लेशन आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)