दोन वर्षांत साडेपाच हजारांवर शिक्षकांना ‘जीपीएफ’ पावत्या दिल्याचा शिक्षण विभागाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:03 PM2017-12-28T14:03:22+5:302017-12-28T14:09:08+5:30
अकोला : शिक्षण विभागातील वेतन पथकाने शाळा स्तरावर ५ हजार ६४२ शिक्षकांना दोन वर्षांच्या जीपीएफ पावत्या दिल्याचा दावा केला आहे.
नितीन गव्हाळे
अकोला : जिल्ह्यातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक्षण विभागातील वेतन पथकाने शाळा स्तरावर ५ हजार ६४२ शिक्षकांना दोन वर्षांच्या जीपीएफ पावत्या दिल्याचा दावा केला आहे.
शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमितपणे जीपीएफच्या पावत्या मिळायच्या. या पावत्यांच्या आधारे जीपीएफची किती रक्कम मिळाली, किती जमा झाली, याची माहिती शिक्षकांना मिळत असते; परंतु गत तीन वर्षांपासून जीपीएफच्या पावत्याच मिळत नसल्याची तक्रार शिक्षकांनी मांडली आहे. शिक्षकांनी २0१४-१५, २0१५-१६, २0१६-१७ या तीन वर्षांच्या जीपीएफच्या पावत्या माध्यमिक शिक्षक विभागाकडून मिळायला हव्या होत्या; परंतु या पावत्या शेकडो शिक्षकांना मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे चौकशी केल्यावर, त्यांनी २0१४-१५ मध्ये जीपीएफ खातेदार असलेल्या ३ हजार ७१४ शिक्षकांपैकी ३ हजार २६४ शिक्षकांना शाळा स्तरावर जीपीएफच्या पावत्यांचे वितरण करण्यात आले. तसेच २0१५-१६ मध्ये ३ हजार ५0७ शिक्षकांपैकी २ हजार ३७८ शिक्षकांना जीपीएफची पावती देण्यात आल्याची माहिती दिली. आता केवळ २0१७-१८ या वर्षाच्या जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना वितरित करावयाचे काम बाकी आहे. तेही लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
दोन वर्षांच्या जीपीएफच्या पावत्या शिक्षकांना शाळा स्तरावर देण्यात आल्या आहेत. एकूण ७२२१ शिक्षकांपैकी ५६४२ शिक्षकांना जीपीएफच्या पावत्यांचे वितरण करण्यात आले. २0१७-१८ या वर्षातील जीपीएफच्या पावत्या वितरित करायच्या आहेत.
मनोहर तराळे, प्रभारी वेतन अधीक्षक
माध्यमिक शिक्षण विभाग