पोषण आहाराचे १२ मेन्यू; गुरुजींचे वाढले टेन्शन; शिक्षण विभागाचे मार्गदर्शनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 10:12 AM2024-09-12T10:12:09+5:302024-09-12T10:12:32+5:30

हिशेब कसा ठेवावा? शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

Education department has decided 12 menu types for children are getting nutritious food, this becoming a headache for the teachers. | पोषण आहाराचे १२ मेन्यू; गुरुजींचे वाढले टेन्शन; शिक्षण विभागाचे मार्गदर्शनच नाही

पोषण आहाराचे १२ मेन्यू; गुरुजींचे वाढले टेन्शन; शिक्षण विभागाचे मार्गदर्शनच नाही

नितीन गव्हाळे

अकोला : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने १२ मेन्यूचे प्रकार ठरवून दिले. प्रत्येक दिवशीचे मेन्यू कार्ड शिक्षक, मुख्याध्यापकांना दिले आहे. मुलांना पोषण आहार मिळत असला, तरी १२ मेन्यू शिक्षकांसाठी डोकदुखी ठरत आहेत. 

विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्यामुळे आता  आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून  वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश केला. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला, तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ यांचा हिशेब ठेवावा लागणार आहे. तो कसा ठेवावा? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

कधीपासून करणार सुरू

शालेय शिक्षण विभागाने पोषण आहारामध्ये १२ मेन्यू वापरण्याचे निर्देश ६ सप्टेंबर रोजी दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने मंगळवारी सर्व केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पोषण आहार देण्यास सांगितले आहे. 

या आहेत अडचणी 

नाचणीसत्व, दूध पावडर, साखर, गुळ, सोयाबीन वडी, कांदा, लसूण, तेल, जिरे, कडधान्य आदी साहित्याचा पुरवठा झालेला नाही.  दिवसभरातून तीनवेळा मुलांना नाचणीसत्व, तांदळाची खीर, पुलाव, मोड आलेले कडधान्य द्यावे लागेल.  नाचणी सत्व हे अन्नधान्य 
महामंडळाकडून पुरविण्यात येणार आहे. मात्र, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने वरील साहित्य खरेदी करून बिल सादर करायचे. शिक्षण संचालकांमार्फत त्याची रक्कम देण्यात येईल. तसेच हिशोब ठेवून बिले जमा करायची. त्यांची वही, रजिस्टरमध्ये नोंद करायची.

कोणत्या पाककृती ?

पोषण आहारामध्ये भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळीची खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण-भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य आदी पदार्थांचा समावेश आहे.

 केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांना जि.प. सीईओंच्या बैठकीत सूचना दिल्या आहेत. लागणारे साहित्य मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने खरेदी करून शिक्षण संचालकस्तरावर देयक द्यावे. -रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक

Web Title: Education department has decided 12 menu types for children are getting nutritious food, this becoming a headache for the teachers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.