सभापतींनी घेतला शिक्षण विभागाचा धांडोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 12:57 AM2017-05-23T00:57:40+5:302017-05-23T00:57:40+5:30
कर्मचारी गैरहजर: काहींचे अर्जही नाहीत; दौऱ्यांबाबत संभ्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अधिकारी दौऱ्यावर असताना सुरू असलेली बेबंदशाही सभापती पुंडलिकराव अरबट यांनी सोमवारी दुपारी दिलेल्या अचानक भेटीतून उघड झाली. यावेळी चार कर्मचारी अर्ज नसतानाच गैरहजर, दौऱ्याची नोंद न करताच कार्यालयात अनुपस्थित असल्याचे पुढे आले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्रही त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
सभापती अरबट यांनी भेटीदरम्यान विविध मुद्यांची माहिती घेतली. त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक उषा खेडकर अर्ज न देताच अनुपस्थित आढळल्या. दौऱ्याबाबतची नोंदही कुठेच नाही. कनिष्ठ सहायक गजानन पुंडकर यांची हजेरी पुस्तिकेत सही नाही, रजेचा अर्जही नव्हता. अधीक्षक गिरी २० मे पर्यंत रजेवर होत्या. सोमवारी रुजू होणे अपेक्षित असताना त्या आल्या नाहीत. सांख्यिकी विस्तार अधिकारी सुखदेवे यांचीही स्वाक्षरी नाही. दौऱ्यावर गेल्याची नोंदही नाही. विस्तार अधिकारी साजिया हक यांची २० मे रोजी दौऱ्यावर असल्याची नोंद आहे. मात्र, आज उपस्थित नव्हत्या. तसेच २३ मे रोजीचा दौरा नोंदलेला आहे. कनिष्ठ सहायक गावंडे यांचाही रजेचा अर्ज नाही, हजेरीपंजीत नोंद नाही. कनिष्ठ सहायक सारिका ठाकरे यांनी उषा खेडकर यांच्या हजेरीपंजीतील नावासमोर दौरा लिहून दिशाभूल केली आहे. या प्रकरणी संबंधितांची बिनपगारी सुटी करून चुकीचे दौरे लिहिणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईची मागणी सभापती अरबट यांनी पत्रातून केली.
शिक्षण विभागातील ३३५ देयके थकीत
कनिष्ठ सहायक सारिका ठाकरे यांच्याकडे वैद्यकीय परिपूर्ती देयकांचा प्रभार आहे. त्यांच्याबाबत विविध शिक्षक संघटनांच्या तसेच शिक्षकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याकडील देयकांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या कार्यरत झाल्यापासून ८५, तर त्यापूर्वीची २५० देयके प्रलंबित असल्याचे पुढे आले. देयक प्रलंबित असल्याची कारणे त्यांना सांगता आली नाहीत. हा गंभीर मुद्दाही उघड झाला आहे.