शाळांची दिवाळी सुटी न वाढविण्यावर शिक्षणाधिकारी ठाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:21 PM2019-10-20T12:21:35+5:302019-10-20T12:21:41+5:30
शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी पुढील शैक्षणिक नियोजन करूनच सुटी जाहीर केली आहे
अकोला: माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सर्व शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन २५ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत शाळांना दिवाळीची सुटी जाहीर केली आहे; परंतु शिक्षण समन्वय समितीने इतर जिल्ह्यांचे दाखले देत, शाळांच्या दिवाळी सुटीत ७ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याची मागणी केली आहे; परंतु या मागणीला शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘खो’ दिला असून, शाळांची दिवाळी सुटी न वाढविण्यावर शिक्षणाधिकारी मुकुंद ठाम आहेत.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाने ११ नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने १३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र व पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ११ नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या सुटीची पत्रे सोशल मीडियावरील शिक्षकांच्या ग्रुपवर फिरत आहेत. या पत्रांचा आधार घेत, शिक्षण समन्वय समितीने माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना निवेदन देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा विचार करता, ७ नोव्हेंबरपर्यंत सुटी वाढवून देण्याची मागणी केली होती. शिक्षणाधिकाºयांनी केवळ दहा दिवसच सुटी जाहीर केली. अनेक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत शिक्षक, मुख्याध्यापक निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत. निवडणूक कामाचा ताण लक्षात घेता, शाळांच्या दिवाळी सुट्या वाढविण्याची मागणी शिक्षण समन्वय समितीने केली आहे; परंतु शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी पुढील शैक्षणिक नियोजन करूनच सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सुटी वाढविणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)