शिक्षणाधिकारी झाल्या रूजू अन् कार्यालयात लागली आग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:44+5:302021-09-16T04:24:44+5:30
अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर डॉ. सुचिता पाटेकर या १५ सप्टेंबर रोजी रूजू झाल्या. त्या रूजू होताच, शिक्षणाधिकारी कार्यालयापासून ...
अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर डॉ. सुचिता पाटेकर या १५ सप्टेंबर रोजी रूजू झाल्या. त्या रूजू होताच, शिक्षणाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एका क्वॉर्टरमधील रेकॉर्ड, फाईलना आग लागली. यात ३० वर्षांपूर्वीचे जुने रेकाॅर्ड जळले. मनपा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून या आगीवर नियंत्रण मिळवले. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची बदली झाल्यानंतर जवळपास आठ महिने प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे यांनी माध्यमिकचा पदभार सांभाळला. आता परभणीहून बदलीवर आलेल्या डॉ. सुचिता पाटेकर यांनी शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यावर काही तासांतच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयालगतच्या एका क्वॉर्टरला अचानक आग लागली. यात काही कागदपत्रे व फाईल जळल्या. जुने रेकॉर्ड असल्यामुळे फारसे नुकसान झालेले नाही. मनपा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. शिक्षणाधिकारी डॉ. पाटेकर रूजू होताच, क्वॉर्टरला आग लागल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अशी लागली आग
शिक्षणाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर मारूतीचे मंदिर आहे. या मंदिरालगत एक जुने क्वॉर्टर आहे. कार्यालयातील काही कागदपत्रे व फाईल पावसामुळे भिजल्या. त्यामुळे ही कागदपत्रे व फाईल या क्वॉर्टरच्या एका खोलीमध्ये ठेवल्या होत्या. मंदिराजवळ काही युवक जुगार खेळतात. सिगारेट, मद्यपान करतात. कुणीतरी सिगारेट फेकल्यामुळे या क्वॉर्टरला आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.