शिक्षक भरतीसाठी प्रथम द्यावी लागेल शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:12 PM2018-06-23T14:12:41+5:302018-06-23T14:14:59+5:30
अकोला: खासगी शिक्षण संस्थांमध्ये रिक्त जागांवर शिक्षकाची नेमणूक करायची असेल तर शिक्षण संस्थेला शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन प्रथमत: शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी लागणार आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: खासगी शिक्षण संस्थांमध्ये रिक्त जागांवर शिक्षकाची नेमणूक करायची असेल तर शिक्षण संस्थेला शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन प्रथमत: शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी लागणार आहे. वृत्तपत्रात जाहिरात देणे बंधनकारक नाही. आवश्यक असेल तर त्यांनी जाहिरात द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आता शिक्षक भरतीबाबत शासनाने निर्णय घेतल्यामुळे बेरोजगार उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत. २0१0 पासून शासनाने शिक्षक भरती करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे बेरोजगार डीएड्, बीएड् शिक्षकांची संख्या वाढली आहे, तसेच शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक पदासाठी शासनाने टीईटी व अभियोग्यता चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. गत दोन वर्षांमध्ये हजारो बेरोजगार कोट्यवधी रुपयांचे परीक्षा शुल्क भरून शिक्षकांनी टीईटी व अभियोग्यता चाचणी(अॅप्टीट्युड) दिली; परंतु शासन शिक्षक भरतीच घेत नसल्यामुळे हजारो शिक्षक बेकार झाले आहेत. खासगी शिक्षण संस्था शाळांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पुढाकार घेत असताना, त्यावरही शिक्षण विभाग निर्बंध लादत आहेत. भरती बंदी काळात नोकरीवर लागलेल्या राज्यातील शेकडो शिक्षकांना शासनाने घरचा रस्ता दाखविला. आताही शासनाने खासगी शिक्षण संस्थांना शिक्षकांची नेमणूक करायची असेल तर शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाºयांची परवानगी घेऊन वृत्तपत्रात जाहिरात देण्याऐवजी प्रथम शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात टाकावी, असा अजब निर्णय घेतला आहे आणि वृत्तपत्रात जाहिरात दिलीच पाहिजे, असे नाही, असेही म्हटले आहे. वृत्तापत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून हजारो बेरोजगार शिक्षकांना कोणत्या शाळेत किती रिक्त जागा, त्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती, मुलाखतीची तारीख व वेळ कळते. शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवरील जाहिरात पाहणार तरी कोण? आणि आम्हाला रिक्त पदांची माहिती मिळणार तरी कशी, असा सवाल डीएड्, बीएड् शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
आॅनलाइन अर्ज मागविले जातील
खासगी शिक्षण संस्थांनी रिक्त जागा भरण्यासाठी काढलेली जाहिरात प्रथम शालेय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर टाकावी. त्यानंतर बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात येतील. पात्रताधारक उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. सर्वाधिक गुणवत्तेनुसार आवश्यक उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती करणे संबंधित संस्थांना बंधनकारक राहील.
पुण्यात झाले अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण
शिक्षक भरतीसंदर्भात १८ व १९ जून रोजी पुणे येथे राज्यातील शिक्षण उप-संचालक, शिक्षणाधिकाºयांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये अधिकाºयांना शिक्षक भरती आणि त्याबद्दलच्या नियमावलीची माहिती देण्यात आल्याची माहिती आहे.
शिक्षक भरतीसाठी शिक्षण संस्थांना शिक्षण विभागाच्या पोर्टलवर जाहिरात द्यावी लागणार आहे. यातून वृत्तपत्रांना वगळण्यात आले नाही. शिक्षण संस्थांना वृत्तपत्रांमध्येसुद्धा जाहिरात द्यावी लागणार आहे. यासंदर्भात पुण्याला प्रशिक्षण होणार आहे.
चंदनसिंग राठोड, शिक्षण उपसंचालक
अमरावती विभाग.