सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी प्रभावी कायदा करा - रणधीर सावरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 03:31 PM2020-03-03T15:31:16+5:302020-03-03T15:31:25+5:30
दोषींना कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी विधानसभेत आ. रणधीर सावरकर यांनी केली.
अकोला : सायबर गुन्ह्याला आळा घालण्याची नितांत आवश्यकता असून, अशा गुन्ह्यांची उकल होऊन दोषींना कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी विधानसभेत आ. रणधीर सावरकर यांनी केली.
आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक व्यवहार पार पडत आहेत. ग्रामीण भागात शासकीय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ई-मेल, व्हॉट्स अॅप, फेसबुक आदी माध्यमातून व्यवहार केल्या जात आहेत. इंटरनेटच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अपेक्षित जनजागृती होत नसल्यामुळे मागील काही दिवसांत सायबर गुन्ह्यात वाढ झाल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मागील ५ वर्षात राज्यात १६ हजार ५१ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून, पोलीस तपास यंत्रणेला केवळ २८ टक्के गुन्ह्यांची उकल करणे शक्य झाले का, यासाठी राज्यात स्वतंत्र सायबर कक्ष सुरू केले का, असे नानाविध प्रश्न आ. सावरकर यांनी उपस्थित केले. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रकरणांमध्ये राज्यभरात ६,०२० आरोपींना अटक केल्याचे सांगत सायबर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस घटकातील एकूण ३,२५३ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.