‘पॅरामेडिकल’ सेवांसाठी मनुष्यबळ निर्मितीचा प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 AM2021-06-02T04:16:01+5:302021-06-02T04:16:01+5:30
अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक ‘पॅरामेडिकल’ सेवांसाठी लागणारे मनुष्यबळ निर्मितीकरिता ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण ...
अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक ‘पॅरामेडिकल’ सेवांसाठी लागणारे मनुष्यबळ निर्मितीकरिता ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत कौशल्य विकास विभागाद्वारे व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयासह नामांकित खासगी हॉस्पिटल्समधून ९०० युवक, युवतींना प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कौशल्य विकास समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी संजय देशमुख, जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे एम.बी. बंडगर, सहायक प्रशिक्षण अधिकारी एस. बी. घोंगडे, आयटीआयचे उपप्राचार्य एस.आर. ठोकळे, जिल्हा नियोजन अधिकारी शास्त्री तसेच खासगी रुग्णालयांचे व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले. राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत कोविड उपचार करताना वैद्यकीय प्रशिक्षित मनुष्यबळाचा जाणवणारा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्याकरिता आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना लगेच विविध वैद्यकीय संस्थांमध्ये विविध पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील युवक, युवतींना प्रत्यक्ष हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज येथे प्रशिक्षण दिले जाईल. या कार्यक्रमात युवक व युवतींना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. इच्छुक प्रशिक्षणार्थींना गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करता येणार असून, या उपक्रमात जिल्ह्यातील रुग्णालयांनी सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.