महापालिकेत नवीन विद्युत साहित्याचे कंत्राट देण्यासाठी आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:33 AM2020-12-13T04:33:26+5:302020-12-13T04:33:26+5:30
महापालिका प्रशासनाच्या उदासीन धाेरणामुळे शहरात मूलभूत साेयी सुविधांचा फज्जा उडाल्याची परिस्थिती आहे. प्रभागांमध्ये साफसफाईचा बाेजवारा उडाला असून, अस्वच्छतेमुळे विविध ...
महापालिका प्रशासनाच्या उदासीन धाेरणामुळे शहरात मूलभूत साेयी सुविधांचा फज्जा उडाल्याची परिस्थिती आहे. प्रभागांमध्ये साफसफाईचा बाेजवारा उडाला असून, अस्वच्छतेमुळे विविध आजारांची साथ पसरली आहे. काेराेना विषाणूमुळे पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत चालली असताना अकाेलेकरांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे बंद असून, सायंकाळ हाेताच नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. अर्थात, यासर्व समस्यांकडे जातीने लक्ष देऊन तातडीने निकाली काढण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असताना मनपाकडून साफ काणाडाेळा केला जात आहे. अशास्थितीत अनावश्यक बाबींवर खर्च करण्यात काेणतीही कसर ठेवली जात नसल्याचे दिसत आहे. मनपा कार्यालयातील जुन्या विद्युत साहित्यामुळे वीज देयकात वाढ झाल्याची सबब पुढे करीत शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून नवीन विद्युत साहित्य लावण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रकाशित केली. गतवेळी हा विषय मंजुरीसाठी स्थायी समितीसमाेर आला असता शिवसेनेच्या आक्षेपामुळे या विषयाला स्थगिती देण्यात आली हाेती. येत्या १५ डिसेंबर राेजी आयाेजित स्थायी समितीच्या सभेत या विषयाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.
आयुक्त साहेब, जरा याकडेही लक्ष द्या !
शासनाने नवीन विद्युत साहित्यासाठी तरतूद केलेला निधी खर्च न केल्यास हा निधी परत जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. तर दुसरीकडे मनपातील काेणत्याही विभागात गेल्यास शासनाचे वरिष्ठ अधिकारी वगळल्यास इतर सर्व विभागांमध्ये विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुर्च्यांची सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी नसून टेबल, खुर्च्यांची दुरवस्था पाहता आयुक्त साहेब, जरा याकडेही लक्ष द्या, असा सूर उमटत आहे.