खराब गहू गरीब लाभार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 07:53 AM2019-04-04T07:53:01+5:302019-04-04T07:53:42+5:30
वखारने केले हात वर: गव्हाची उचल थांबविली
अकोला : केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातील भिजलेला, कीडग्रस्त, प्रमाणापेक्षा अधिक आर्द्रता असलेला खराब गहू अखेर गरीब लाभार्थींच्या माथी मारण्याचा प्रकार निवडणुकीच्या धामधुमीत सुरू झाला आहे. बुधवारी पातूर, बाळापूर तालुक्याच्या गोदामांत प्राप्त पोत्यांत काही खराब गव्हाची पोती आढळली. गोदामपालांनी माहिती देताच जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. वानखेडे यांनी बाळापुरात धाव घेतली. सोबत गहू परत घेण्याचे वखार व्यवस्थापनाला कळविले; मात्र वखारने हात झटकल्याने दुपारनंतर गोदामातून गव्हाची उचल थांबवावी लागली.
‘एफसीआय’ने राज्य शासनाला धान्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेतले. अकोला कृषी उत्पन्न बाजार परिसरातील दोन गोदामात गव्हाचा साठा करण्यात आला. ४ ते ६ मार्च २०१९ दरम्यान, पोत्यांमधील गहू खराब असल्याचे वखार महामंडळाच्या वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांच्या लक्षात आले. त्यांनी थेट एफसीआय भोपाळ, नागपूर प्रादेशिक कार्यालय, केंद्रीय वखार महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठांना ही बाब कळविली. त्यांच्या तक्रारीनुसार १५ मार्च रोजी एफसीआय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पी. के. बिहारी यांनी अकोला गोदामात भेट दिली.
खातरजमा न केल्याने गोंधळ
वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी न झाल्याने गोदामातील खराब गव्हाची माहिती पुढे आली नाही. तरीही एफसीआय व्यवस्थापक किशोरीलाल यांनी गव्हाची उचल करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार उचल सुरू झाली. पण संपूर्ण गव्हाची खातरजमा न झाल्याने तेथेच गोंधळ झाला. तोच खराब गहू काही प्रमाणात वाहनांत टाकून लाभार्थींच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बुधवारी उघड झाले.