विद्यापिठाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न

By admin | Published: September 30, 2015 11:55 PM2015-09-30T23:55:59+5:302015-09-30T23:55:59+5:30

कुलगुरू मोहन खेडकर यांनी साधला संवाद.

The efforts of the university to make people work oriented | विद्यापिठाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न

विद्यापिठाचे कामकाज लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न

Next

नीलेश जोशी /खामगाव (बुलडाणा): खामगावात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव तब्बल २0 वर्षानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू झाला. या उद्घाटन कार्यक्रमासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर खामगावमध्ये आले होते. यावेळी त्यांच्याशी परीक्षा पद्धतीमधील सुधारणा, विद्यापीठ लोकाभिमूख कसे होईल, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठस्तरावर करण्यात येत असलेले प्रयत्न, आगामी काळातील विद्यापीठाचे नवे उपक्रम यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ब दर्जा मिळालेल्या विद्यापीठाला अ दर्जा प्राप्त करण्यासाठी सध्या कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्न :विद्यापीठ लोकाभिमूख करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहेत का ?

सामाजिक दायित्वाच्या दृष्टीकोनातून विद्यापीठ आपल्या दारी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, गेल्या आठवड्यात राणी तांबोळी येथे एक कार्यक्रम घेण्यात येऊन राज्य शासनाच्या ३८ योजना आदिवासी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान आदिवासींच्या समस्यांची जाणीव झाली. साध्या योजनांचीही माहिती त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांच्या उत्थानासाठी या प्रकारचा लोकाभिमूख उपक्रम हाती घेतला आहे.

प्रश्न : युवा महोत्सवाबद्दल काय सांगाल ?

 शिक्षण हे एक नोकरी, व्यवसाय मिळविण्याचे साधन आहे; पण कला, संगीताच्या माध्यमातून माणसाला कसं जगाव आणि का जगावं हे शिकवते. त्यामुळे असे युवा महोत्सव हे तरुणाईला बरंच शिकवून जातात. त्यानुषंगानेच युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणाद्वारे नोकरी , व्यवसायात स्थैर्य मिळते, कलेच्या माध्यमातून जीवन जगण्याची कला शिकता येते.

प्रश्न : विद्यापीठाचे निकाल त्वरित लागण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का ?

निकाल वेळेत लागावे यासाठी प्रामुख्याने इंजिनियरिंगसाठी बारकोड पद्धत आणली आहे. हिवाळी परीक्षेपासून ती लागू होत आहे. रिव्हॅल्यूएशनचे फॉर्मही ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. परीक्षेच्या कामात टाळाटाळ करणार्‍यांवर येत्या काळात दंडात्मक कारवाई होणार असून, त्यांच्या सेवापुस्तिकेमध्ये नोंद, तसेच एक ते दहा हजार रुपयापर्यंत दंड करता येईल. यापूर्वी असे होत नव्हते. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नासंदर्भातही ही बाब लागू आहे. परीक्षेच्या कामात दिरंगाई करणार्‍या प्राचार्य, शिक्षक, कर्मचार्‍यांवर त्यामुळे प्रसंगी कारवाई केली जाईल. परीक्षेचा निकाल उशिरा लागणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही.

प्रश्न : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठस्तरावर काही प्रयत्न होत आहेत का ?

विद्यापीठातंर्गत पंजाबराव देशमुख नियमन केंद्र आहे. त्याच्या माध्यमातून दरवर्षी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात.वर्षभरात चार ते पाच कार्यशाळा घेतल्या जातात. शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येतात. प्रशासकीय पातळीवरही तहसिलदार व संबंधित कर्मचार्‍यांनाही त्याबाबत अवगत करून योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी उपाययोजनात्मक चर्चा केली जात आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.

प्रश्न : काही नवीन संकल्पनांवर काम सुरू आहे का ?

येत्या दोन महिन्यात नॅशनल अँक्रीडेशन कौन्सीलची चमू येणार आहे. ब दर्जाच्या आपल्या विद्यापीठाला अ दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असून त्यानुषंगाने सध्या युद्धस्तरावर आम्ही काम करत आहोत. हा दर्जा मिळाल्यास युजीसीच्या अनेक योजनांचा फायदा विद्यापीठास मिळेल. या योजनांसाठी विद्यापीठाला अ दर्जा असावा, अशी अट असते. तो मिळाल्यास आपल्याला भरपूर फायदा होईल. प्रत्येक कर्मचारी व विद्यार्थीही अभिमानाने आम्ही अ दर्जाच्या विद्यापीठात काम करतो किंवा शिक्षण घेत आहोत हे सांगू शकेल. लवकरच नॅकची टीम विद्यापीठाला भेट देणार आहे.

Web Title: The efforts of the university to make people work oriented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.