एग्ज इटर मृतावस्थेत आढळला
By admin | Published: September 30, 2015 12:30 AM2015-09-30T00:30:48+5:302015-09-30T00:30:48+5:30
एग्ज इटर हा दुर्मीळ साप जळगाव जामोद परिसरातच मृतावस्थेत दिसून आला.
जळगाव जामोद (जि. बुलडाणा): सर्पविश्वात दुर्मीळ प्रजातीचा म्हणून गणला जाणारा इंडियन एग्ज इटर हा भारतीय अंडीखाऊ साप २९ सप्टेंबर स्थानिक सर्पमित्र शरद जाधव यांना मृतावस्थेत आढळून आला. सर्वप्रथम हा साप १९१३ मध्ये चंद्रपूरमध्ये आढळून आला होता. त्यानंतर मात्र ही प्रजाती नामशेष झाल्याचे वृत्त होते. तथापि, २00५ मध्ये अमरावती येथे हा इंडियन एग्ज इटर दुसर्यांदा आढळल्याची नोंद झाली. त्यानंतर २0११ मध्ये जळगाव जामोद शहरातच कैलास इंगळे यांच्या घरात हा साप सर्पमित्रांना आढळला. तेथूनच दोन कि.मी. अंतरावर आणखी एकाचे वास्तव्य दिसून आले. सर्पमित्र शरद जाधव यांना मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना हा साप बर्हाणपूर रोडवरील मदरशाजवळ रोडवर मृतावस्थेत आढळला. त्यांनी त्याची तात्काळ ओळख पटवून वनअधिकार्यांना सूचना दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी डी. डी. अरू, वनरक्षक एस.के. घुगे यांनी पंचनामा करून सदर सापाला जाळून नष्ट केले. यावेळी सदर साप हा कुठल्या तरी वाहनाच्या चाकाखाली आल्याचा अंदाज सर्पमित्र सुनील भगत, शरद जाधव यांनी व्यक्त केला.