अंगणवाडीच्या मुलांपर्यंत अंडे पोहोचलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:34 PM2019-03-19T12:34:00+5:302019-03-19T12:34:07+5:30
अकोला: दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आदिवासीबहुल परिसरातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
अकोला: दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आदिवासीबहुल परिसरातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. ‘स्वयंम’ प्रकल्पांतर्गत शासनाने लहान मुलांच्या आहारात अंड्यांचा समावेश करणे व स्वयंरोजगार निर्मितीसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करून ५ कोटी ६० लक्षचा निधी वितरित केला असता, अंगणवाडीच्या मुलांपर्यंत अंडे पोहोचलेच नसल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेच अमरावती विभागातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतील अनागोंदी कारभार पाहता या प्रकरणाची चौकशी होण्याचे संकेत आहेत.
दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या कुपोषणाला आळा बसावा, आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशातून शासनाने स्वयंम प्रकल्पाच्या माध्यमातून कुक्कुटपालन, स्वयंरोजगार निर्मिती तसेच अंगणवाडीतील लहान मुलांच्या पोषक आहारासाठी निधीची तरतूद केली. २०१८-१९ आर्थिक वर्षांमध्ये ८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ५ कोटी ६० लक्षच्या निधीतून आदिवासींना लाभ देण्याचा प्रयत्न झाला असता, त्यात अनेक उणिवा असल्याचे चित्र समोर आले. अंगणवाडीतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करण्याचा समावेश होता. राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा तसेच अमरावती विभागातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील मुलांपर्यंत पुरेशा प्रमाणात अंड्यांचा पुरवठा झाला नसल्याची माहिती आहे. असे असताना या विभागामार्फत पुन्हा २ कोटी ४० लक्षचा निधी वितरित करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभागातील संबंधित क र्मचारी, पुरवठादार यांचे साटेलोटे लक्षात घेता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे.