आठ बसेस धावल्या, ४०० वर प्रवाशांनी केला प्रवास

By Atul.jaiswal | Published: January 12, 2022 11:56 AM2022-01-12T11:56:20+5:302022-01-12T11:56:52+5:30

State Transport : जिल्ह्यातील तीन आगारांमधून आठ बसेस मंगळवारी रस्त्यावर धावल्या.

Eight buses ran, over 400 passengers traveled | आठ बसेस धावल्या, ४०० वर प्रवाशांनी केला प्रवास

आठ बसेस धावल्या, ४०० वर प्रवाशांनी केला प्रवास

googlenewsNext

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानंतर गत दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून संपावर असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) अकोला विभागातील आणखी दहा कर्मचारी मंगळवारी कामावर रुजू झाले. परिणामी, अकोला जिल्ह्यातील तीन आगारांमधून आठ बसेस मंगळवारी रस्त्यावर धावल्या. यामधून ४०० अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती आहे.

शासकीय सेवेत विलीनीकरण या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर असल्याने लालपरी ठप्प झाली आहे. शासनाकडून आतापर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फी, बदली, सेवासमाप्ती कारवाया करण्यात आल्या. अकोला विभागातील ४२४ कर्मचाऱ्यांना निलंबित, तर ९१ जणांची बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाच आगारांपैकी अकोला-२, अकोला-१ व अकोट या तीन आगारांमधून आठ बसेस रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये अकोला आगार क्र. २ मधून सर्वाधिक सहा बसेस असून, अकोला क्र. १ व अकोट आगारातील प्रत्येकी एक बस आहे. तेल्हारा व मूर्तिजापूर आगारातून एकही बस बाहेर पडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

...अशा धावल्या बसेस

अकोला आगार क्रमांक २ मधून दोन बसेस अकोटसाठी, २ बसेस शेगावसाठी, तर २ बसेस अमरावतीसाठी धावल्या. अकोला आगार क्र. १ मधून एक बस मंगरूळपीरकरिता धावली. अकोट आगाराची एक बस अकोला येथे आली होती. मंगरूळपीर आगाराचीही एक बस अकोला येथे आली होती.

२० हजारांची कमाई

अकोला आगार क्र. २ मधून मंगळवारी एकूण सहा बसेस धावल्या. या गाड्यांमधून जवळपास ४०० प्रवाशांनी प्रवास केला. या फेऱ्यांमधून आगाराला २० हजार रुपयांची कमाई झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

कर्मचारी भूमिकेवर ठाम

संप मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले असले, तरी एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे मंगळवारी दिसून आले. अकोला विभागातील आणखी १० कर्मचारी कामावर रुजू झाले; परंतु बहुतांश कर्मचारी संपातच सहभागी आहेत.

Web Title: Eight buses ran, over 400 passengers traveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.