अकोला महापालिकेत स्थायी समितीचे आठ सदस्य होणार निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 10:55 AM2021-02-11T10:55:02+5:302021-02-11T10:55:15+5:30
Akola Municipal Corporation निवडीसाठी मनपाच्या मुख्य सभागृहात येत्या १८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला : महापालिकेत १६ सदस्यीय स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नवीन आठ सदस्यांच्या निवडीसाठी मनपाच्या मुख्य सभागृहात येत्या १८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता असून, १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपचे दहा सदस्य आहेत. उर्वरित शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समितीमध्ये समावेश आहे. समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार असल्याने या सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी येत्या १८ फेब्रुवारी रोजी मनपात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुकांकडून मनधरणी
स्थायी समितीचा कार्यकाळ आता एक वर्षाचा शिल्लक राहिला असून त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये मनपाची सार्वत्रिक निवडणूक पार पडेल. त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी या अपेक्षेतून इच्छुकांकडून पक्षश्रेष्ठींची मनधरणी केली जात आहे.
आठ सदस्य होतील निवृत्त
सत्ताधारी भाजपमधून राहुल देशमुख, हरीश काळे, अनिता चौधरी, दीपाली जगताप, माधुरी मेश्राम तसेच शिवसेनेतून शशिकांत चोपडे, काँग्रेसमधून चांदनी शिंदे व वंचित बहुजन आघाडीप्रणीत लोकशाही आघाडीतून किरण बोराखडे आदी सदस्य निवृत्त होणार आहेत.