मनपा स्थायी समितीतील आठ सदस्यांची निवड
By admin | Published: March 1, 2016 01:31 AM2016-03-01T01:31:02+5:302016-03-01T01:31:02+5:30
भाजपचे बाळ टाले, सतीश ढगे, राकाँच्या शमशाद बेगम यांना पुन्हा संधी.
अकोला: महापालिकेच्या सोळा सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे पायउतार झालेल्या आठ सदस्यांच्या ऐवजी नवीन आठ सदस्यांची निवड सोमवारी करण्यात आली. सत्ताधारी भाजपने बाळ टाले, सतीश ढगे तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने शमशाद बेगम शेख फरीद यांना पुन्हा संधी दिली.
सोळा सदस्यीय स्थायी समितीमध्ये आठ सदस्यांना मार्च महिन्यात दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे नवीन आठ सदस्यांची निवड सोमवारी मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला नगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य सभापती दादासाहेब मेश्राम व स्थायी समितीचे सभापती पप्पू शर्मा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्याकडे बंद लखोट्यांमध्ये स्थायी समितीवर निवडून जाणार्या सदस्यांची नावे दिली. उपमहापौर विनोद मापारी यांनी लखोटे उघडून पत्राचे वाचन केले.
भाजपच्या बैठकीत निर्देश
स्थायी समितीच्या गठनाला न्यायालयाचे ग्रहण लागले आहे. हायकोर्टात प्रलंबित याचिकांचे उत्तर सादर करण्याच्या मुद्यावर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी दुपारी आयोजित बैठकीत नगरसेवकांना निर्देश दिले.
सभागृह नेता, गटनेता पदावर महिला राज
भाजपने दीड वर्षांपूर्वी सभागृहनेता पदी योगेश गोतमारे यांची निवड केली होती. त्यांच्या जागेवर आता नगरसेविका गीतांजली शेगोकार तसेच गटनेता पदासाठी वैशाली शेळके यांची निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यपदी भाजपने प्रतिभा अवचार यांना संधी दिली.