‘स्थायी’चे आठ सदस्य होणार पायउतार; आज विशेष सभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:47 AM2018-02-20T02:47:39+5:302018-02-20T02:47:49+5:30
अकोला : महापालिकेतील स्थायी समितीच्या गठनाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. नियमानुसार एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्थायीमधील १६ सदस्यांपैकी आठ सदस्यांना नवृत्त व्हावे लागते. त्यासाठी ईश्वर चिठ्ठी काढली जाणार असून, उद्या मंगळवारी स्थायी समिती सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेतील स्थायी समितीच्या गठनाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. नियमानुसार एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्थायीमधील १६ सदस्यांपैकी आठ सदस्यांना नवृत्त व्हावे लागते. त्यासाठी ईश्वर चिठ्ठी काढली जाणार असून, उद्या मंगळवारी स्थायी समिती सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाला भरभरून मतांचे दान दिले. निवडणुकीच्या निकालाअंती २३ फेब्रुवारी २0१७ रोजी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने महापालिकेची सत्ता मिळवली. मार्च महिन्यात महापौर, उपमहापौर पदाची निवड झाल्यानंतर १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन करण्यात आले. यामध्ये भाजपाच्यावतीने बाळ टाले, माजी महापौर सुमनताई गावंडे, योगिता पावसाळे, सुजाता अहिर, हरीश आलीमचंदानी, सुनील क्षीरसागर, अजय शर्मा, विशाल इंगळे, पल्लवी मोरे, माधुरी बडोणे यांना संधी देण्यात आली. काँग्रेसकडून अँड. इक्बाल सिद्दीकी, पराग कांबळे, राकाँचे फै याज खान, शिवसेनेकडून राजेश मिश्रा, सपना नवले, एमआयएमचे मोहम्मद मुस्तफा यांची वर्णी लागली होती. स्थायी समिती सदस्यांची निवड केल्यानंतर मार्च २0१७ मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक बाळ टाले यांची निवड करण्यात आली होती. मनपाच्या नियमानुसार स्थायी समितीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यास १६ पैकी आठ सदस्यांना ईश्वर चिठ्ठीद्वारे नवृत्त करावे लागते. त्यासाठी २0 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ईश्वर चिठ्ठीद्वारे स्थायीमधील कोणत्या आठ सदस्यांना नवृत्त व्हावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदस्यांमध्ये धाकधूक!
महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम २0 (३) व (४) अन्वये ईश्वर चिठ्ठीद्वारे आठ सदस्यांना नवृत्त करावे लागते. या आठ सदस्यांमध्ये आपला समावेश आहे का, या विचाराने स्थायी समिती सदस्यांमध्ये धाकधूक वाढल्याचे बोलल्या जात आहे.