आठ हजार तक्रारी; केवळ १११ शेतकऱ्यांना मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:18 AM2021-04-09T04:18:49+5:302021-04-09T04:18:49+5:30
यावर्षी हंगामात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन उगवण विषयक तक्रारी वाढल्या. त्यासोबत जिल्ह्यात अनेक भागात सदोष ...
यावर्षी हंगामात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन उगवण विषयक तक्रारी वाढल्या. त्यासोबत जिल्ह्यात अनेक भागात सदोष सोयाबीनचा पुरवठा झाल्याने उगवणशक्ती प्रभावीत झाली. सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे मशागत, पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके, कष्ट व मजुरी यावरील संपूर्ण खर्च वाया गेला. सोयाबीनचे बियाणे बोगस असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये महाबीज बियाणे व खासगी कंपनी बियाणे अशा जिल्ह्यात ८ हजार ३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी पाहणीदरम्यान ६८१ तक्रारीत बियाणे सदोष आढळून आले होते. सदोष बियाणे संदर्भात पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने कंपन्यावर न्यायालयीन दावे दाखल केले आहे. याप्रकरणी निपटारा सुरू केला; मात्र यातील केवळ १११ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. उर्वरित ५७० शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात आली नाही. सदोष बियाणे आढळणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे व रोख स्वरुपात रक्कम दिली गेली.
--बॉक्स--
महाबीजच्या प्राप्त तक्रारी
३३६१
खासगी कंपनीच्या प्राप्त तक्रारी
४६७८
महाबीजचे आढळलेले सदोष बियाणे
३३५
खासगी कंपनीचे आढळलेले सदोष बियाणे
३४६
--बॉक्स--
असा मिळाला मोबदला
मोबदल्याच्या स्वरुपात महाबीजने ५ शेतकऱ्यांना २२ बियाण्यांच्या बॅग दिल्या, तर ३५ शेतकऱ्यांना ३ लाख ६६ हजार ४०० रुपये रोख रक्कम दिली. तसेच खासगी कंपनीने २७ शेतकऱ्यांना १५१ बियाणे बॅग दिल्या, तर ४४ शेतकऱ्यांना ५ लाख २४ हजार ४६० रुपये रोख रक्कम दिली.
--बॉक्स--
उर्वरित तक्रारींचा निपटारा कठीणच!
सदोष आढळलेल्या ६८१ तक्रारींपैकी ५७० शेतकऱ्यांना कुठलीही मदत देण्यात आली नाही. या शेतकऱ्यांना मदत देण्यास कंपन्या इच्छुक नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे यापुढेही या शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीणच झाले आहे.