Srikanth Shinde: एकनाथ शिंदेंना मिळालेले मुख्यमंत्रिपद थेट नव्हे ४० वर्षाच्या मेहनतीचे फळ, श्रीकांत शिंदेंचा टाेला
By राजेश शेगोकार | Published: August 23, 2022 02:55 PM2022-08-23T14:55:43+5:302022-08-23T14:56:54+5:30
Srikanth Shinde: एकनाथ शिंदे यांनी सामान्य कुटूंबातून संघर्ष करत त्यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळेच ते लाेकांचे नेते असून सर्वाना सहज उपलब्ध असतात असा टाेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
- राजेश शेगोकार
अकाेला - एकनाथ शिंदे यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे थेट मिळाले नाही, त्यांनी ४० वर्ष परिश्रम केले, संघटना वाढविली, सामान्य कुटूंबातून संघर्ष करत त्यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळेच ते लाेकांचे नेते असून सर्वाना सहज उपलब्ध असतात असा टाेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
खा. शिंदे हे वाशीम येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरिता अकाेल्यात आले असता माजी आ. गाेपीकिशन बाजाेरिया यांच्या निवासस्थानी झालेल्य कार्यक्रमात बाेलत हाेते. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी राहणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी राज्यभर लवकरच दाैरे करू, आम्ही घेतलेला निर्णय याेग्यच हाेता याची साक्ष राज्यभरातील जनतेच्या प्रतिसादावरून लक्षात येते. आमचे मुख्यमंत्री हे जनतेचे आहेत, त्यांना भेटण्यासाठी काेणाचीही चिठ्ठी लागत नाही, ते सहज उपलब्ध असतात, २४ तास लाेकांमध्ये राहतात त्यामुळे निवेदन, अर्ज, विनंती असा प्रकार त्यांच्याकडे नाही थेट प्रश्नाला हात घालून ऑन द स्पाॅट प्रश्न साेडविण्यावर त्यांचा भर असल्याचे खा. शिंदे म्हणाले.
यावेळी मंचावर भाजपाचे नेते आ.प्रविण दरेकर, परभणीचे खासदार हेमंत पाटील, माजी आ. गाेपीकिशन बाजाेरिया, आ. लखन मलीक, आ. विप्लव बाजाेरिया, अकाेला जिल्हा शिवसेनाप्रमुख अश्वीन नवले आदी उपस्थित हाेते. माजी आ. बाजाेरिया यांनी प्रास्ताविकात अकाेल्याच्या विमानतळाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती देत धावपट्टी वाढविणे तसेच रात्रीचे उड्डाण याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांचे लक्ष वेधले. संचालन महानगरप्रमुख याेगेश अग्रवाल यांनी केले.