अकोल्यातील इसमाची आपातापा शिवारात हत्या
By admin | Published: May 9, 2017 02:51 AM2017-05-09T02:51:01+5:302017-05-09T02:51:01+5:30
अकोल्यातील ४0 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
बोरगाव मंजू : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आपातापा शिवारात बंधू गोट्यानजिक अकोल्यातील ४0 वर्षीय इसमाची हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
आपातापा-म्हैसांग रस्त्यावर बंधू गोट्यानजिक रस्त्याच्या बाजूला एका इसमाचे प्रेत पडलेले असल्याची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता मृतक जगतसिंह रतीरामसिंग कुशवाह रा.खोलेश्वर अकोला असल्याचे स्पष्ट झाले. कुशवाह यांच्या मानेवर, डोक्यावर व इतर ठिकाणी घाव आढळल्याने त्यांचा खूनच झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना घटनास्थळावर एमएच ३0 एक्स १६२७ क्रमांकाची दुचाकी आढळली. तसेच घटनास्थळाजवळ कोयताही आढळला. घटनास्थळावर पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आदींना पाचारण केले. या प्रकरणी बळीराम सिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर ठाणेदार पी.के. काटकर, पीएसआय अशोक पितळे, संजय घायवट, संजय तेलंग, प्रवीण वाकोडे आदींनी भेट दिली.