न्यायालयीन कोठडीतील वृद्ध आरोपीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:30 IST2020-07-24T10:29:49+5:302020-07-24T10:30:08+5:30
रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्याजवळ असलेल्या तात्पुरत्या कारागृहातील बंदिवान वृद्ध आरोपीची बुधवारी रात्री अचानक प्रकृती चिंताजनक झाली.

न्यायालयीन कोठडीतील वृद्ध आरोपीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्थानिक रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्याजवळ असलेल्या तात्पुरत्या कारागृहातील बंदिवान वृद्ध आरोपीची बुधवारी रात्री अचानक प्रकृती चिंताजनक झाली. त्याला त्वरित सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी कलम १७४ अन्वये अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध आरोपीच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस ठाण्यांतर्गत कोलसारा गावातील रहिवासी जगदेव मारोती वरघाट (६५) असे मृतकाचे नाव आहे. वरघट कुटुंबातील सहा सदस्यांनी कुटुंबातील सुनेवर शारीरिक व मानसिक अत्याचार करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, या आरोपावरून जगदेव वरघट यांच्यासह वरघट कुटुंबातील ५ सदस्यांव्यतिरिक्त एका महिलेवर ३० जून रोजी गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी १ जूनला आरोपींना अटक केली. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सर्व आरोपींना ३ जुलै रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सर्व आरोपींना तात्पुरत्या स्वरूपातील कारागृहात टाकण्यात आले आहे.
या दरम्यान बुधवारी रात्री आरोपी जगदेव वरघाट अचानक आजारी पडला. त्याने तुरुंगात आपल्या कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली. त्याने तुरुंगातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर जगदेव वरघट याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. न्यायालयीन कोठडीत या वृद्ध आरोपींचे शवविच्छेदन करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यावर गुरुवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत अहवाल मिळाला नव्हता. त्यामुळे मृत्यूचे कारण समोर आले नाही.