वयाेवृद्ध नागरिक भर उन्हात ताटकळत; पिण्यासाठी पाणी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:23+5:302021-03-04T04:34:23+5:30
काेराेना रुग्णांच्या वाढत्या संख्येला अटकाव घालण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील ...
काेराेना रुग्णांच्या वाढत्या संख्येला अटकाव घालण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यादरम्यान, महापालिकेच्या लसीकरण केंद्रात गेलेल्या वयाेवृद्ध नागरिकांना भर उन्हात तासन् तास ताटकळत उभे राहावे लागले. त्यांना बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची मनपा प्रशासनाने काेणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे वयाेवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचे चित्र दिसून आले.
संसर्गजन्य काेराेना विषाणूचा सर्वाधिक धाेका वयाेवृद्ध नागरिकांना आहे. यातही असाध्य व्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्यास ते उपचारांना तातडीने प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळेच देशात काेराेनाचा शिरकाव झाल्यानंतर वयाेवृद्ध नागरिकांचा मृत्युदर जास्त असल्याचे समाेर आले. दरम्यान, काेराेनाला अटकाव घालण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार १ मार्चपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाेवृद्ध नागरिकांना लस देण्याच्या माेहिमेला महापालिका प्रशासनाने प्रारंभ केला आहे. यामध्ये शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, मनपाचे किसनीबाई भरतिया रुग्णालय, कस्तुरबा गांधी रुग्णालय, हरिहरपेठ येथील नागरी आराेग्य केंद्र व सिंधी कॅम्प येथील नागरी आराेग्य केंद्रामार्फत खडकी येथे तत्कालीन ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मनपाने वयाेवृद्ध नागरिकांच्या बसण्याची व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित हाेते. या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता केली नसल्याने नागरिकांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे चित्र समाेर आले.
वयाेवृद्ध नागरिक सावलीच्या शाेधात
मनपाच्या किसनीबाई भरतिया रुग्णालय, हरिहर पेठ येथील नागरी आराेग्य केंद्र व खडकी येथे वयाेवृद्ध महिला व पुरुषांना भर उन्हात उभे राहावे लागले. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेक नागरिक भिंतीच्या आडोशाला उभे हाेते. तर काही नागरिक ऑटाेमध्ये बसून हाेते.
कस्तुरबा रुग्णालयात पाण्याचा अभाव
जुन्या शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उन्हाची समस्या नसली तरी ज्येष्ठ नागरिकांना आवारात बसण्यासाठी खुर्च्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. लस दिल्यानंतर रुग्णालयात बेंच व खाटांची व्यवस्था दिसून आली. परंतु एकाच बेंचवर अनेक व्यक्तींना दाटीने बसावे लागल्याचे पाहावयास मिळाले.
लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याची सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जातील.
- डाॅ.अस्मिता पाठक, प्रभारी वैद्यकीय अधिकारी मनपा
...फाेटाे : विनय टाेले...