शंकरबाबांच्या दिव्यांग मानसपुत्राला अकोल्यातील वृद्ध दाम्पत्यांची एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:45 PM2018-10-13T13:45:23+5:302018-10-13T13:46:09+5:30
अकोला : अनाथ आणि गतिमंदांंचे नाथ म्हणून राज्यभरात ओळखल्या जाणारे शंकरबाबा पापडकर यांचे दिव्यांग मानसपुत्र विदूर, या २३ वर्षीय पदवीधर युवकांचा शैक्षणिक वारसा स्वीकारत अकोल्यातील वृद्ध दाम्पत्य विमल आणि अॅड. देवीदास पिंपळे यांनी एक लाख रुपयांची भरीव मदत केली आहे.
- संजय खांडेकर
अकोला : अनाथ आणि गतिमंदांंचे नाथ म्हणून राज्यभरात ओळखल्या जाणारे शंकरबाबा पापडकर यांचे दिव्यांग मानसपुत्र विदूर, या २३ वर्षीय पदवीधर युवकांचा शैक्षणिक वारसा स्वीकारत अकोल्यातील वृद्ध दाम्पत्य विमल आणि अॅड. देवीदास पिंपळे यांनी एक लाख रुपयांची भरीव मदत केली आहे. पिंपळे दाम्पत्यांनी केलेली सढळ मदत समाजासाठी आदर्शासोबतच डोळ्यात अंजन घालणारी सिद्ध होत आहे.
परतवाडा तालुक्यातील वत्झर येथील स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबांच्या आश्रमातील दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेला मानसपुत्र विदूर याने नुकताच समाजसेवा विषयांतून पदवी मिळविली. ‘एमपीएससी’च्या माध्यमातून त्याला वरिष्ठ अधिकारी व्हायचे आहे. एकीकडे अनाथ असलेल्या १२३ मुला-मुलींचा सांभाळ आणि दुसरीकडे दिव्यांग असलेल्या या मुलाच्या डोळ्यात भविष्याचे स्वप्न. जिथे दररोजच्या दानापाण्याची सोय नाही, तिथे या मुलाला उच्चशिक्षण द्यायचे तरी कसे, या विवंचनेत सापडलेल्या शंकरबाबांनी नेहमी आश्रमाला साथ देणाऱ्यांना आवाहन केले. शंकरबाबांच्या हाकेला साद देत अकोल्यातील जुन्या काळातील केमिस्ट आणि अॅड. देवीदास पिंपळे (८८) यांनी एक लाखाची मदत करण्याचे कबूल केले. ठरल्याप्रमाणे शंकरबाबांचा मानसपूत्र विदूर पापडकर आणि आश्रमाचे व्यवस्थापक जयगुरू मुंदेकर शुक्रवारी अकोल्यात पोहोचले. कोणताही परिचय नाही. पत्ता माहीत नसताना केवळ सेल्युलर मोबाइल फोनवरून हे दोघे जवाहर नगरातील पिंपळे यांच्या निवासस्थानी शोध घेत पोहोचले. घराच्या बाहेरदेखील फारसे पडू न शकणाºया या वृद्ध दाम्पत्यांनी सेंट्रल बँक खात्याचा एक लाखाचा धनादेश या अनाथ-दिव्यांग असलेल्या विदूरच्या हाती दिला. अॅड. देवीदास आणि विमल हे वयोवृद्ध दाम्पत्य एकमेकांना आधार देत तर जगत आहेच, सोबतच सामाजिक भान ठेवून त्यांनी विदूरसारख्या दिव्यांग मुलाला मदत करून भविष्याची दिशा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
मला आणि माझ्या भावंडांना फडणवीस सरकारने मदत करावी!
पितृत्वाच्या जबाबदारीतून पिंपळे दाम्पत्यांनी दिलेले ऋण कधीही विसरणार नाही. जेव्हा अधिकारी होईल, तेव्हा गोरगरिबांना आणि शंकरबाबांच्या लेकरांना मदत करण्यासाठी आयुष्य खर्च करीन. समाजातून तर आम्हाला मदत होते; पण राज्याच्या फडणवीस सरकारनेदेखील मला आणि माझ्या भावंडांना मदत करावी, किमान नोकरी देऊन जगण्याचे बळ द्यावे, अशी प्रतिक्रिया विदूर शंकरबाबा पापडकर याने व्यक्त केली.