भूमी अभिलेख कर्मचार्यांचे पोलिसांनी नोंदविले बयाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:15 AM2017-08-03T02:15:10+5:302017-08-03T02:15:31+5:30
अकोला : संतोषी माता मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीचा असलेला तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कागदोपत्री हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात बुधवारी भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन व आताच्या कर्मचार्यांना ठाण्यात बोलावून त्यांचे बयाण नोंदविले. चार कर्मचार्यांचे बयाण नोंदविल्यानंतर आता तत्कालीन अधिकारीही या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिराच्या पाठीमागील भागात (माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर) मोठे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून २0 कोटी रुपये किमतीचा ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर म्हणजेच तब्बल ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंडाची कोणतेही हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचार्यांच्या संगनमताने गजराज गुडदमल मारवाडी यांच्या नावाने हा भूखंड असल्याची संगणकीकृत खोटी नोंद घेण्यात आली आहे. त्यानंतर अशाच प्रकारच्या बनावट दस्तावेजाद्वारे खोटे मालमत्ता पत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यानंतर या जागेचे फ ेरफार व अन्य दस्तावेजही बनावट तयार करून, त्याची विक्री करण्याच्या हालचाली सुरू होताच, या प्रकरणाची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. सदर प्रकरणाचे दस्तावेज ‘लोकमत’च्या हाती येताच, या प्रकरणाला वाचा फोडली.
तसेच पोलिसांनीही भूमी अभिलेख कार्यालयाकडून दस्तावेज व त्यांचा अहवाल मागविला. सदर अहवाल प्राप्त झाला असून, त्यानंतर बुधवारी सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी या प्रकरणातील चार कर्मचार्यांचे बयाण नोंदविले आहे. सदर भूखंड गजराज मारवाडी यांच्या नावावर करण्यासाठी येथील तत्कालीन अधिकारी आणि कर्मचार्यांची मिलीभगत असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
गजराज मारवाडीच्या हयात असण्यावर प्रश्नचिन्ह
‘लोकमत’च्या वृत्तानंतर सदर प्रकरण चांगलेच पेटले. त्यानंतर पोलिसांनी गजराज गुदडमल मारवाडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिटी कोतवाली पोलिसांनी अशा नावाचा व्यक्ती अद्यापपर्यंत आढळला नाही. हा व्यक्ती हयात आहे की नाही, या संदर्भात संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे हा भूखंड हडपण्यासाठी ज्या गजराज मारवाडीचे नाव व दस्तावेज वापरण्यात आले, त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भुखंड प्रकरणाच्या चौकशीचे आदेश भूमि अभिलेख विभागाला देण्यात आले आहेत. चौकशी करुन दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
- संजय खडसे
प्रभारी उपविभागीय अधिकारी, अकोला