अकोला जिल्हयातील ११६ सरपंच, उपसरपंचपदांची आज निवडणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 09:54 AM2021-02-09T09:54:29+5:302021-02-09T09:54:58+5:30
Grampanchayat Sarpanch Election प्रथम विशेष सभा घेण्यात येणार असून, या सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका झालेल्या २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मंगळवार, ९ फेब्रुवारी जिल्ह्यातील ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात येणार असून, या सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या असून, निवडणुकांचे निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार २०२० ते २०२५ या कालावधीकरिता जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण गत आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपद व उपसरपंचपदांची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचातींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात येणार असून, या विशेष सभांंमध्ये ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे. सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडणुकांची तयारी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सरंपच, उपसरपंचांची निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या !
तालुका ग्रा.पं.
तेल्हारा १७
अकोट १९
मूर्तिजापूर १४
अकोला १८
बाळापूर २३
बार्शिटाकळी १४
पातूर ११
.........................................................
एकूण ११६
१०८ सरपंच, उपसरपंचपदांची निवडणूक गुरुवारी !
जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक दोन टप्प्यांत घेण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ९ फेब्रुवारी रोजी ९ फेब्रुवारी रोजी ११६ सरपंच व उपसरपंचपदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत गुरुवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील १०८ सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक घेण्यात येणार आहे.