अकोला जिल्ह्यातील २१७ सरपंच पदांची निवडणूक उद्यापासून
By admin | Published: August 25, 2015 02:53 AM2015-08-25T02:53:40+5:302015-08-25T02:53:40+5:30
गावागावांत उत्सुकता शिगेला; अध्यासी अधिका-यांची नेमणूक.
अकोला : जिल्ह्यातील २१७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया बुधवार, २६ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पृष्ठभूमीवर नवे सरपंच-उपसरपंच कोण, याबाबत गावागावांत ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरपंच पदांच्या निवडणुकांसाठी सातही तालुक्यात अध्यासी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पाच वर्षाची मुदत संपणार्या जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांचे निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर झाल्यानंतर, २१७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक २६ ते ३१ ऑगस्टदरम्यान घेण्यात येत आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या पहिल्या विशेष सभा आयोजित करण्यात आल्या असून, त्यामध्ये सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी सातही तहसील कार्यालयांमार्फत अध्यासी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक होत असल्याच्या स्थितीत, गावाचा नवा सरपंच आणि उपसरपंच कोण होणार, याबाबत गावागावांतील ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच सरपंच व उपसरंपच पदावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुक उमेदवारांसह सर्मथकांकडून मोर्चे बांधणीलाही वेग आला आहे.