जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा निवडणूक आयोगाने मागविला अहवाल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:32+5:302021-09-03T04:20:32+5:30
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम दीड महिन्यापूर्वी स्थगित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोटनिवडणुका ...
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम दीड महिन्यापूर्वी स्थगित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोटनिवडणुका होत असलेल्या क्षेत्रातील कोरोना प्रादुर्भावाच्या सद्य:स्थितीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला आहे. यासंदर्भात गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणनिहाय कोरोना परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘ओबीसी’ प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्हा परिषदेतील १४ आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांमधील २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने, रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पोटनिवडणुकांच्या सुरू झालेल्या प्रक्रियेत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या ९ जुलैच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या परिस्थितीत स्थगित करण्यात आलेल्या पोटनिवडणुकांच्या जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांतील कोरोना प्रादुर्भावाची सद्य:स्थिती काय आहे, कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या किती आहे, आदी परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगामार्फत २ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणनिहाय क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी;
पोटनिवडणुकांवरील स्थगिती उठणार?
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूक कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, पोटनिवडणुकांवरील स्थगिती उठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील पोटनिवडणुका होत असलेल्या जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांतील कोरोना परिस्थितीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाने मागविला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांवरील स्थगिती उठणार आणि पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील स्थगित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या क्षेत्रातील कोरोना प्रादुर्भावाची सद्य:स्थिती आणि कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रुग्ण संख्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार संबंधित यंत्रणांकडून माहिती घेऊन, राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी