निवडणुकीची रणधुमाळी, तालुक्यात सेनेला शिलेदारच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:23 AM2021-09-24T04:23:24+5:302021-09-24T04:23:24+5:30

तेल्हारा : गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेने तालुकाप्रमुखपद रिक्त आहे. त्यात तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ...

Election is in full swing, Sena has no stone unturned in the taluka! | निवडणुकीची रणधुमाळी, तालुक्यात सेनेला शिलेदारच नाही!

निवडणुकीची रणधुमाळी, तालुक्यात सेनेला शिलेदारच नाही!

Next

तेल्हारा : गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेने तालुकाप्रमुखपद रिक्त आहे. त्यात तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. असे असतानाही शिवसेनेने अद्यापही तालुकाप्रमुखाची नियुक्ती केली नाही. ऐन निवडणूक उंबरठ्यावर असताना इच्छुकांपैकी कोणत्याही एका नावाची घोषणा करण्याच्या मन:स्थितीत सेना नाही. निवडणूक पार पडल्यानंतरच सेनेच्या तालुकाप्रमुखाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील दानापूर, अडगाव व तळेगाव बाजार या तीन जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरुवात झाली असून, ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे. प्रत्येक उमेदवार प्रचार करीत असून, उमेदवारांसोबत शिवसैनिक तसेच पदाधिकारी दिसत आहेत. माजी तालुकाप्रमुख विजय मोहोड यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. तालुकाप्रमुखच नसल्याने तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना निवडणुकीदरम्यान काही अडचणी किंवा प्रश्न निर्माण होत असतील, तर त्या कोणापुढे मांडाव्यात, असा प्रश्न पडला आहे. निवडणुकीचे नियोजन करून ज्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या मागे जबाबदारीने उभे राहून, जबाबदारी स्वीकारणे तालुकाप्रमुखाचे काम असते. पक्षाने नियुक्त केलेले पदाधिकारी व शिवसैनिक जरी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत असले तरी शिवसैनिकांना एकत्रित आणून पक्षाचा प्रचार करण्यासाठी तालुकाप्रमुख पावले उचलतो; परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीतही तालुकाप्रमुखाची नियुक्ती झाली नसल्याने शिवसैनिक संभ्रमात आहेत.

वंचितची मदार जुन्या पदाधिकाऱ्यांकडेच

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानंतरही नवीन नियुक्ती होईपर्यंत जुन्याच पदाधिकाऱ्यांकडे निवडणुकीच्या नियोजनाची व प्रचाराची जबाबदारी असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी सांगितले.

तालुकाप्रमुख पदासाठी अनेक शिवसैनिक इच्छुक आहेत. त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात आले आहे. तेच अंतिम निर्णय घेतील. मात्र, या निवडणुकीत केवळ तालुकाप्रमुख नसल्याने त्याचा काही फारसा परिणाम होणार नाही. प्रत्येक शिवसैनिक हा समर्थपणे जबाबदारी पार पाडतो.

-नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होताच काही दिवसांत नगर परिषद व सहकार क्षेत्रातील निवडणूक होऊ घातल्या असल्याने तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षपदाला महत्त्व प्राप्त झाल्याने नेमकी कोणाची नियुक्ती होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Election is in full swing, Sena has no stone unturned in the taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.