कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यातील दाेन कृषी शास्त्रज्ञांची निवड'
By राजेश शेगोकार | Published: August 30, 2022 04:18 PM2022-08-30T16:18:32+5:302022-08-30T17:42:15+5:30
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यातील दाेन कृषी शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली
अकोला : कृषी विद्यापीठे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख करण्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि विधानसभा तथा विधान परिषद आदी विविध प्रवर्गातून सदस्यांची निवड विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर राज्यपाल यांच्या मान्यतेने होत असते. याच अंतर्गत डॉ. विजय माहोरकर व डॉ. प्रदीप इंगोले यांची राज्यपाल कार्यालयाद्वारे निवड करण्यात आली आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत असलेले भारतीय कृषी वैज्ञानिक भरती मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. चारुदत्त मायी यांचा सदस्य पदाचा कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला असून, त्यांचे जागी विद्यापीठाचे भूतपूर्व संचालक विस्तार शिक्षण डॉ. विजय माहोरकर यांची नियुक्ती झाली तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कार्यकारी परिषद सदस्य तथा स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्ववरलू यांचा सुद्धा सदस्यत्वाचा कालावधी २९ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला असून, त्यांच्या जागेवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला तथा स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे भूतपूर्व संचालक विस्तार शिक्षण डॉ. प्रदीप इंगोले यांची निवड राज्यपाल कार्यालयाद्वारे करण्यात आली आहे.