जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; ‘वंचित’चेच फटाके !
By संतोष येलकर | Published: November 5, 2022 07:28 PM2022-11-05T19:28:07+5:302022-11-05T19:29:54+5:30
जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या चार सभापतिपदांसाठी गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शनिवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये सर्वाधिक मते प्राप्त करीत वंचित बहुजन आघाडीच्या चारही उमेदवारांनी विजय मिळविला.
अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या चार सभापतिपदांसाठी गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल शनिवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये सर्वाधिक मते प्राप्त करीत वंचित बहुजन आघाडीच्या चारही उमेदवारांनी विजय मिळविला. समाजकल्याण सभापतीपदी आम्रपाली खंडारे, महिला व बालकल्याण सभापतीपदी रिजवाना परवीन शेख मुख्तार आणि अन्य दोन विषय समित्यांच्या सभापतीपदी माया नाइक व योगीता रोकडे यांना विजयी घोषित करण्यात आले. चारही सभापतीपदांच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने, जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा जल्लोष करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि दोन विषय समित्यांसह चार सभापतिपदांसाठी २९ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य लता पवार यांना सदस्यपदासाठी अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी २८ ऑक्टोबर रोजी दिला. या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर सभापतिपदांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला होता. त्यानुसार चारही सभापतिपदांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया राखून ठेवण्यात आली होती.
संबंधित प्रकरणात १ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये सदस्य लता पवार यांना सदस्यपदासाठी अपात्र ठरविण्याचा अमरावती विभागीय आयुक्तांनी दिलेला आदेश रद्द करीत या प्रकरणात येत्या ९ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी पुनर्सुनावणी घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुषंगाने उच्च न्यायालय, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडणुकीचा निकाल ५ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद सभागृहात घोषित करण्यात आला.
त्यामध्ये समाजकल्याण सभापतीपदी आम्रपाली खंडारे, महिला व बालकल्याण सभापतीपदी रिजवाना परवीन शे.मुख्तार आणि विषय समिती सभापतीपदी माया नाइक व योगीता रोकडे विजयी झाल्याचे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी डाॅ.निलेश अपार यांनी घोषित केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुरज गोहाड आदी उपस्थित होते.