निवडणुकीचा भाेंगा, अंतिम प्रभाग रचना १७ मे पर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2022 12:32 PM2022-05-11T12:32:51+5:302022-05-11T12:32:58+5:30
Election News : निवडणूक आयाेगाने १७ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत.
अकोला : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून थंडावलेल्या महापालिका निवडणुकीचा मार्ग सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाने माेकळा झाला. आता यामध्ये आणखी एक पाऊल पडले असून निवडणूक आयाेगाने १७ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत.
अकाेला मनपासह राज्यातील १४ महापालिकांचा कालावधी ८ मार्च राेजी संपुष्टात आला. या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयाेगाने १ फेब्रुवारी राेजी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्याचे निर्देश महापालिकांना दिले हाेते. प्रभाग रचनेवर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती, सूचना सादर करण्याची मुदत हाेती. प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर मनपा प्रशासनाकडे प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य निवडणूक आयाेगाने जी. श्रीकांत यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली हाेती. २२ फेब्रुवारी राेजी सुनावणीची प्रक्रिया आटाेपल्यानंतर आयाेगाकडे अभिप्राय सादर करण्यात आला हाेता. हा अभिप्राय अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही त्यामुळे आता प्रभाग रचना अंतिम करताना हरकतीवरचा निर्णयही दिला जाणार आहे. अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामाेर्तब झाल्यानंतर निवडणुकीचे भाेंगे जाेमाने वाजणार आहेत.
प्रभाग रचनेतील फेरबदलाची शक्यता कमीच
राज्य सरकारच्या निर्णयामुळे मनपा निवडणुका लांबणीवर जाण्यासाेबतच प्रभाग रचनेतही फेरबदल हाेण्याची शक्यता बळावली हाेती; मात्र बुधवारी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाहता मनपा प्रशासनाला नव्याने प्रभाग रचना करण्याची गरज भासणार नाही तसेच हरकतींना किती गंभीरतेने घेतले जाते यावर काही प्रभाग रचनेतील बदल अपेक्षित आहेत; मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग रचनेतील फेरबदलाची शक्यता कमीच आहे.
.........