ग्रामीण भागात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त!

By admin | Published: June 18, 2017 02:00 AM2017-06-18T02:00:48+5:302017-06-18T02:00:48+5:30

वीजपुरवठय़ा अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Electric spill in rural areas; Civil stricken! | ग्रामीण भागात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त!

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठय़ा अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कुरूम : येथील ऑक्सिजनवर असलेला वीज पुरवठा दहा-दहा मिनिटांनी खंडित होत असल्याने तसेच वादळी वार्‍याने नेहमी रात्रभर बत्ती गूल राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खंडित वीज पुरवठय़ामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत होत असून, गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या माना उपकेंद्रावरून कुरुमसह सात ते आठ गावांना वीज पुरवठा होतो; परंतु तांत्रिक बिघाडाने कुरुम व परिसरातील गावाची नेहमीच दहा-दहा मिनिटांनी बत्ती गूल होते. पावसाळा लागल्याने थोडा जरी वादळी वारा सुटला किंवा पाऊस आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. रात्री बिघाड झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते. कुरुमवासीयांना नेहमीच एक दिवसाआड संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागत आहे. कुरुम येथे मुस्लीम बांधवांची संख्या जास्त असून, सध्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. वीज पुरवठा खंडित राहत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुरुम येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून, येथे एक कनिष्ठ अभियंता व सात कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र कनिष्ठ अभियंतासह एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रीच्या वेळेस वीज पुरवठय़ात बिघाड होऊन खंडित झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते व दुसर्‍या दिवशी विद्युत कर्मचारी कर्तव्यावर आल्यावर तो बिघाड दुरुस्त झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होतो, तोपर्यंंत विजेशिवाय काम भागवावे लागते. मोठा बिघाड झाल्यास ६ ते ७ तास दुरुस्त करण्यात येत नाही. संपूर्ण कुरुम गाव हे ग्रा.पं.च्या नळ योजनेच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून असल्यामुळे वीज पुरवठा खंडित राहिला तर कुरुम येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.  
दिनोडा : चोहोट्टा वीज वितरण अंतर्गत येणार्‍या दिनोडा, मरोडा गावात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाऊस सुरू होताच लाइन गूल होते. रात्रभर ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विद्युत वितरणचे दुर्लक्ष होत आहे.
रेल फिडरवर गेल्या काही दिवसांपासून कधी ना कधी दैनंदिन तांत्रिक बिघाड होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रात्रभर लाइन बंद पडत असून, ग्रामस्थांना डासांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे थेंब पडले की लाइन बंद, असा प्रकार गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू आहे. सदर लाइन केव्हा सुरळीत होणार, याची संबंधित अभियंता यांनी लक्ष देऊन रेल फिडरवरील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

आलेगावात अधिकार्‍यांची दांडी
आलेगाव : परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज पुरवठा विस्कळीत असताना वीज वितरणचे उप अभियंत्यांनी मात्र दांडी मारली आहे. खंडित वीज पुरवठय़ामुळे २७ गावांतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आलेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशनवरून २७ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. या २७ गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्रभर अंधारात रहावे लागते. मुख्यालयी अधिकारी आणि कर्मचारी राहत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. थोडास पाऊस आला, तरी वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी वीज वितरणचे जे कामे करायला हवी होती, ती सुद्धा करण्यात आली नसल्याने वीज पुरवठा नेहमी खंडित होतो. दुर्गम भागातील चोंढी, पिंपरडोळी, चारमोळी, पांढुर्णा या गावांमध्ये, तर दोन-दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. या भागातील ग्रामस्थांना तक्रार करायची असल्यास दोन किमी पायदळ आलेगाव येथे जावे लागते. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सध्या पावसाचे दिवस आहेत. आलेगाव परिसर मोठा व काही भाग जंगलात असल्याने अनेक वेळा वीज पुरवठा तांत्रिक कारणांनी बंद होतो. हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी नेहमी कर्मचारी कार्यरत असतात. तसेच कार्यालयातील हजेरी बुकवर आपण स्वाक्षरी केलेली नाही.
- खंडारे, उप अभियंता,
वीज उपकेंद्र आलेगाव

Web Title: Electric spill in rural areas; Civil stricken!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.