थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी कापणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2017 02:23 AM2017-02-05T02:23:15+5:302017-02-05T02:23:15+5:30

महावितरणची धडक मोहीम; नाईलाजास्तव करावी लागणार कारवाई.

Electricity connections for outstanding water supply schemes! | थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी कापणार!

थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी कापणार!

Next

अकोला, दि. ४- वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने संपूर्ण राज्यात धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. वीज देयक थकीत असलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. या पृष्ठभूमीवर थकबाकी असलेल्या राज्यभरातील सर्वच वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना व उपसा सिंचन योजनांवर विशेष जोर देण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांवरही नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याची माहिती महावितरणमधील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पाणीपुरवठा योजना या ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येतात. या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजना नागरी सुविधांमध्ये मोडत असल्याने त्यांच्याकडे थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला शक्य होत नाही. तथापि, थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणचे ४ प्रादेशिक संचालक व १६ परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामात कुचराई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थकबाकी वसुलीस वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांवरही वीजपुरवठा खंडित केला जाण्याची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पाणीपुरवठा योजनांची थकबाकी ७ कोटींवर
जिल्हय़ात एकूण ८९८ पाणीपुरवठा योजना आहेत. या योजना ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेद्वारा चालविल्या जातात. या योजनांची वीज देयके राज्य शासनाच्या निधीतून भरल्या जातात. जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांकडे २0१६ अखेरपर्यंंत जवळपास ७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी जमा करण्याबाबत महावितरणकडून शासकीय यंत्रणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यानंतरही वीज देयक न भरणार्‍या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा नाईलाजास्तव खंडीत करावा लागणार असल्याचे महावितरणमधील उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले. अकोला परिमंडळातील तीन्ही जिल्हय़ात ही थकबाकी ५0 कोटी आहे.

निर्माण होऊ शकते कृत्रिम पाणीटंचाई
यावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे जिल्हय़ातील जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा आहे. तसेच भूगर्भातील पाणीपातळीही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळय़ात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे आशादायक चित्र सध्या तरी आहे; परंतु थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांना जलाशयांमध्ये पाणी असतानाही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Electricity connections for outstanding water supply schemes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.