वीज अभियंत्यास लाच घेताना पकडले
By admin | Published: October 7, 2015 01:57 AM2015-10-07T01:57:00+5:302015-10-07T01:57:00+5:30
चार हजाराची लाच स्वीकारली ; नवीन विद्युत मीटर घेण्यासाठी मागणी.
बुलडाणा : नवीन वीज मीटर घेण्यासाठी लाचेच्या रकमेपैकी उर्वरित राहिलेले चार हजार रुपये स्वीकारताना येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अंबाडकर यास मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा आठवडी बाजारातील भाजीपाला अडत दुकानदार विजय रामप्रसाद पातालबन्सी (वय ३७) रा.परदेशीपुरा यांनी ५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, पत्नीच्या नावे नवीन विद्युत मीटर घेण्यासाठी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत मधुकर अंबाडकर (वय ४४) यांनी ५ हजार १४६ शासकीय शुल्काव्यतिरिक्त ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी नवीन विद्युत मीटरच्या प्रत्यक्ष पडताळणी दरम्यान ५ ऑक्टोबर रोजी ३ हजार रूपये स्वीकारले व उर्वरित ४ हजार रूपये ६ ऑक्टोबर रोजी कार्यालयात घेऊन येण्यास सांगितले. अशा प्रकारच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ ऑक्टोबर रोजी चिखली रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता अंबाडकर यास त्याच्या कक्षामध्ये पंचासमक्ष लाचेच्या रकमेपैकी उर्वरित ४ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी लाचेची रक्कम जप्त करून आरोपी अंबाडकर विरूद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला कलम ७, १३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक एस.एल.मुंडे, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक व्ही.आर.पाटील, पो.नि.भाईक, पो.नि.खंडारे, ए.एस. आय.भांगे, पोहेकाँ शेगोकार, नेवरे, पो.ना.गडाख, चोपडे, जवंजाळ, ठाकरे, शेळके, ढोकणे, पोकाँ सोळंके, यादव, वारूळे यांनी सहभाग घेतला.