जनता दरबारात वीज ‘मीटर’

By admin | Published: May 20, 2017 01:21 AM2017-05-20T01:21:32+5:302017-05-20T01:21:32+5:30

अकोला: महावितरणचा भोंगळ कारभार एका ग्रामस्थाने ऊर्जामंत्र्यांच्या दरबारात चक्क विद्युत मीटर आणून चव्हाट्यावर आणला.

Electricity meter in public administration | जनता दरबारात वीज ‘मीटर’

जनता दरबारात वीज ‘मीटर’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महावितरणचा कारभार प्रचंड ढेपाळला असून, पैसे भरूनही लोकांना वीजपुरवठा मिळत नाही. काही ठिकाणी तर ग्राहकांच्या घरी केवळ विद्युत मीटर आणून ठेवले जातात. महावितरणचा हा भोंगळ कारभार एका ग्रामस्थाने ऊर्जामंत्र्यांच्या दरबारात चक्क विद्युत मीटर आणून चव्हाट्यावर आणला. बाळापूर तालुक्यातील कळंबा येथील सुभाष उगले हे चक्क हातात विद्युत मीटर घेऊन आले व आपल्याला आतापर्यंत विद्युत पुरवठा मिळाला नसल्याची तक्रार ऊर्जामंत्र्यांकडे केली. दारिद्र्यरेषेखालील योजनेंतर्गत आपल्याला वीज जोडणी मंजूर झालेली असतानाही वीज कर्मचारी जोडणी करून देण्यास तयार नसून, केवळ विद्युत मीटर घरात आणून ठेवल्याचे उगले यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर गावात आणखी १५ जणांच्या घरात असे मीटर ठेवलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकार पाहून ऊर्जामंत्री चकित झाले. त्यानंतर संबंधित उपकेंद्राचा कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना मंचावर बोलावून सदर वीज ग्राहकाच्या हस्ते त्यांना हे मीटर बक्षीस म्हणून देण्यास सांगितले. यावेळी महावितरणचे अधिकारी चांगलेच खजील झाले. सायंकाळपर्यंत सुभाष उगले व इतरांना वीजपुरवठा जोडून देण्याचे आदेश यावेळी ऊर्जामंत्र्यांनी दिले.

अधिकाऱ्यांची संपत्ती तपासा!
सरकारकडून पगार व इतर सुविधा घेतल्यानंतरही महावितरणचे अनेक अधिकारी लोकांची कामे करीत नाहीत. जनतेच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. महावितरणच्या काही अभियंत्यांचे कंत्राटदारांशी साटेलोटे असल्याच्या तक्रारी असून, त्याबाबतचे पुरावेही आहेत. अनेक बडे अधिकारी काही दिवसांत श्रीमंत झाले आहेत. आर्थिक-देवाण-घेवाणीशिवाय हे शक्य नसल्यामुळे येत्या काही दिवसांत महावितरणच्या विदर्भातील सर्वच अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेशच यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांपासून ते सहायक व कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतच्या सर्वांच्या संपत्तीच्या नोंदी तपासा व त्याबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर करा, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या.

Web Title: Electricity meter in public administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.