रस्त्यावरील विद्युत खांब देताहेत अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:53+5:302021-08-23T04:21:53+5:30
राहुल सोनोने वाडेगाव : पातूर-बाळापूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्यालगत असलेली ब्रिटिशकालीन महाकाय झाडे विकासाच्या नावाखाली ...
राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर-बाळापूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, या रस्त्यालगत असलेली ब्रिटिशकालीन महाकाय झाडे विकासाच्या नावाखाली तोडण्यात आली; मात्र रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे विद्युत खांब हे रस्त्याच्या मधोमध तसेच उभे असल्याने ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जात आहे; मात्र विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल सुरू आहे. बाळापूर-पातूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, कामात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगून महाकाय झाडे तोडण्यात आली. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करणाऱ्यांसाठी पोषक असलेले व कामात अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब उभे कसे आहेत, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यामध्ये येत असलेले विद्युत खांब हटविण्याची मागणी होत आहे. तसेच पावसामुळे रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले असून, या रस्त्याच्या दुतर्फा नाल्या करण्याची मागणी होत आहे.
(फोटो)
-----------------
येथील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्याने पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील रस्त्यावरील सिद्धार्थ नगर - श्री जागेश्वर विद्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले विद्युत खांब, अतिक्रमण काढून नाल्या कराव्यात.
- संतोष लोखंडे, वाडेगाव.
-----------------------
वाडेगाव येथील राज्य महामार्गावरील अकोला टी-पाॅईंट-श्री जागेश्वर विद्यालयपर्यंत रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन हे विद्युत खांब त्वरित हटवावेत.
- अंकुश शहाणे, ग्रामस्थ, वाडेगाव.