वीज निर्मिती करणाऱ्या गावातच विजेची समस्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:18 AM2021-05-13T04:18:43+5:302021-05-13T04:18:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पारस : पारस गावात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहे. गावात प्रकल्प असूनही, ग्रामस्थांना विजेच्या समस्येचा सामना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पारस : पारस गावात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहे. गावात प्रकल्प असूनही, ग्रामस्थांना विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. उन्हाचा तडाखा आणि रात्री-अपरात्री वीजपुरवठा बंद होत असल्याने पारस गावातील जनता त्रस्त झाली आहे. कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भावामुळे १० मेपासून लॉकडाऊनमुळे ग्रामस्थ घरातच आहेत. परंतु, वीज गायब होत असल्याने, ग्रामस्थांना उन्हाळ्यात दिवस घालविणे कठीण जात आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. विजेची निर्मिती करणाऱ्या पारस गावातच विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. येथील विजेची समस्या गंभीर बनली आहे. कधीही वीजपुरवठा बंद होत असल्याने, नागरिकांना उकाड्यात दिवस काढणे कठीण जात आहे. कडक निर्बंध लादल्यामुळे घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे करावे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजेच्या लंपडावामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. रात्री-अपरात्री वीज गुल होत असल्याने, ग्रामस्थांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पारस गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.