वीज चोरीचा भुर्दंड सामान्य ग्राहकांना!
By admin | Published: May 19, 2017 01:39 AM2017-05-19T01:39:32+5:302017-05-19T01:39:32+5:30
फॉल्टी मीटरच्या नावाखाली दिले जाते ज्यादा देयक
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड : अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून, त्याचा भुर्दंड सर्वसामान्यांना बसत असल्याचे चित्र आहे. या वीज चोरीची तूट भरून काढण्यासाठी अनेकांना फॉल्टी मीटर दाखवून अव्वाच्या सव्वा बिले देण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. ही वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना करणे अपेक्षित आहे; मात्र वीज वितरण कंपनीने उपाययोजना न करता त्याची तूट सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूल करण्याचा सपाटा लावला आहे. अनेकांना फॉल्टी बिले देऊन मोठ्या प्रमाणात देयक देण्यात येत आहेत. याविषयी तक्रार केल्यास ग्राहकाची समजूत काढून काही प्रमाणात देयक कमी करण्यात येते व उर्वरित देयक टप्प्याटप्प्याने ग्राहकांकडून वसूल करण्यात येत आहे. वीज चोरी पकडण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून थंडावली असून, मार्चअखेर केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी ती राबविली जाते. वीज वापर कमी व देयक जादा असा फंडा महावितरणने सुरू केल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ज्यादा देयक येत असल्याच्या तक्रारी वीज वितरणच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत. अखेर कंटाळलेल्या ग्राहकांना नाइलाजाने ज्यादा आलेले देयक भरावे लागत आहे. राज्याचे ऊर्जामंत्री अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ज्यादा देयकांपासून त्यांनी सर्वसामान्यांची सुटका करावी, अशी अपेक्षा आहे.
महावितरणने अशी लढविली शक्कल !
- घरगुती वीज वापरामुळे येणारी युनिटची संख्या लक्षात घेता जर अतिरिक्त वीज वापर रोहित्राजवळ बसविलेले मीटरयंत्र दाखवित असेल, तर वीज चोरीचा प्रकार सुरू असल्याचे लक्षात येते.
- वीज ग्राहकांच्या मीटर रिडिंगच्या युनिटच्या संख्येपेक्षा अधिभार असल्यास शहानिशा न करताच अनेक ग्राहकांना फॉल्टी मीटर नोंद करून ज्यादा बिल देण्यात येते. जेणेकरून वापरलेले योग्य युनिट संख्या व वीज चोरीची युनिट संख्या यांचा ताळमेळ बसेल.
- तर अनेक ठिकाणी कृषी पंपांचा विद्युत पुरवठा बंद असल्यास गावठान फिडरवरून तो पुरवठा जोडल्या जातो. त्याचा अधिभारही सामान्य ग्राहकांवर लावण्यात येतो.