विषारी औषध देऊन घेतला अकरा माेकाट श्वानांचा बळी, जुने शहरात डाबकी राेड परिसरातील घटना; श्वान पालकांमध्ये भीती
By आशीष गावंडे | Published: September 28, 2022 03:18 PM2022-09-28T15:18:12+5:302022-09-28T15:19:40+5:30
Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे.
- आशिष गावंडे
अकाेला - शहरात माेकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेचे नसबंदी धाेरण सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जुने शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे.
श्वानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ हाेत असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटना समाेर आल्यानंतरही अशा कुत्र्यांना पकडताना महापालिका प्रशासनाकडून नियमांचे दाखले दिले जातात. पिसाळलेल्या कुत्र्याने किमान तीन जणांना चावा घेतला असेल तरच त्याला पकडता येते, असा अजब तर्क मनपाने नसबंदीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून दिला जात असल्यामुळे प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये तिव्र असंताेष निर्माण झाला आहे. भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची प्रक्रिया दिर्घ असल्यामुळे वर्तमानस्थितीत वाढलेल्या कुत्र्यांची समस्या तातडीने निकाली काढण्याची अपेक्षा अकाेलेकरांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या जीवीताला धाेका निर्माण झाल्यानंतरही प्रशासन ठाेस उपाययाेजना करत नसल्याचे दिसत आहे. त्याचे परिणाम मुक्या निष्पाप जनावरांना भाेगावे लागत आहेत. डाबकीराेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा अमानवीय प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे डाबकी राेड परिसरातील श्वान पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उंदिर मारण्याची दिली औषधी
महाराणा प्रताप चाैक, गणेश नगर भागात रविवारी रात्री काही माेकाट श्वान अत्यवस्थ असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी यातील काही श्वान उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले असता, त्यांना उंदिर मारण्याची औषधी दिल्याचे समाेर आले. अत्यवस्थ श्वानावर उपचार केल्यानंतरही त्याचा साेमवारी मृत्यू झाला.
श्वान पालकांनाे खबरदारी घ्या!
घरात महागड्या जातीचे श्वान पाळणे ही आजकाल फॅशन झाली आहे. परंतु त्यांचा सांभाळ करताना अनेकांची कसरत हाेते. श्वान मालक सकाळ,संध्याकाळ श्वानाला घराबाहेर घेऊन निघतात. श्वान खुल्या जागेऐवजी स्थानिक रहिवाशांच्या प्रवेशद्वारात नैसर्गिक विधी उरकतात. घरासमाेर अस्वच्छता निर्माण हाेत असल्यामुळे रहिवाशांमध्ये श्वानांबद्दल तिरस्कार निर्माण हाेताे. यातूनही अनेकदा विषारी औषधी देण्याचे प्रकार घडत असल्याने श्वान मालकांनी असे प्रकार कटाक्षाने टाळण्याची गरज आहे.