अकरा मुले पाण्यात अडकल्याची अफवा अन शोध पथकाची धावाधाव !

By admin | Published: August 4, 2016 01:34 AM2016-08-04T01:34:18+5:302016-08-04T01:34:18+5:30

सोशल मीडियावरचा सैराटपणा : खात्री करूनच माहिती देण्याची गरज.

Eleven children stuck in water and raided the search team! | अकरा मुले पाण्यात अडकल्याची अफवा अन शोध पथकाची धावाधाव !

अकरा मुले पाण्यात अडकल्याची अफवा अन शोध पथकाची धावाधाव !

Next

अकोला, दि. ३: कानशिवणी ते बोरगावमंजू रोडवर अन्वी मिर्झापूर फाट्यानजीकच्या नाल्याच्या पुरात ११ विद्यार्थी अडकल्याचा निरोप व्हॉट्स अँपच्या माध्यमातून फिरला अन् या निरोपावरून पिंजरच्या संत गाडगेबाबा शोध पथकाने तत्काळ धाव घेत घटनास्थळ गाठले. प्रशासनही तत्परतेने हलले. नायब तहसीलदारासह तलाठीही हातचे काम सोडून त्या ठिकाणी धाव घेते झाले. परिसरातील नागरिकही नाल्याकडे निघाले; पण..तिथे गेल्यावर असा कुठलाच प्रकार नसल्याचे समोर आल्यावर सर्वांंनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला; मात्र अशी खोटी माहिती देऊन आपत्कालीन स्थितीमध्ये जीव वाचविणार्‍या पथकाला धावाधाव करण्यास भाग पाडणारे असे प्रकार भविष्यात होता कामा नये, हा धडा या निमित्ताने जनतेने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सर्वात जलद संपर्कासाठी आता व्हॉट्स अँपचा वापर सर्वाधिक वाढला आहे. या मसेज अँप्लिकेशनच्या माध्यमातून आलेल्या संदेशाची कुठलीही खातरजमा न करता हा मॅसेज पुढे फारवर्ड करण्याच्या वृत्तीमुळे अनेकांसामोर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.
बुधवारी संध्याकाळी मुले पाण्यात अडकल्याचा असाच मॅसेज संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाला मिळाला व पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपल्या चमूसह तत्काळ अन्वी मिर्झापूरकडे धाव घेतली.
या प्रवासादरम्यान सुकडीच्या नाल्यावरील पुलावरून दोन फूट पाणी होते; मात्र या पथकाने मुलांच्या जिवाची काळजी करीत पुलावरून गाडी टाकली. अन्वी मिर्झापूर जवळच्या नाल्यावर पोहचल्यावर तेथे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या निर्देशावरून नायब तहसीलदार महेंद्र अत्राम हेसुद्धा तत्काळ तेथे पोहचले; मात्र त्या ठिकाणी असा कुठलाही प्रकार आढळून आला नाही व कुणीतरी चुकीची माहिती प्रसारित केल्याचे समोर आल्याने सार्‍यांनीच रोष व्यक्त केला. असा प्रकार भविष्यात घडत गेल्यास महत्त्वाच्या प्रसंगात तत्काळ मदत होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे अशा अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Eleven children stuck in water and raided the search team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.