अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनेच होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:27 PM2019-06-11T12:27:44+5:302019-06-11T12:27:59+5:30

माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे.

Eleventh entrance process will be done in a central way | अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनेच होणार!

अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीनेच होणार!

Next


अकोला: दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीमध्ये विविध शाखेत प्रवेशाचे विद्यार्थ्यांना वेध लागतात. विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाने गत दोन वर्षांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन सुरू केली आहे. यामुळे शिक्षण संस्थाचालकांमध्ये पोटशूळ उठला आहे. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी यंदासुद्धा अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केले; परंतु याला शिक्षण संस्थाचालकांचा विरोध आहे. प्रवेशाचे अधिकार आम्हालाच द्या, आम्ही मोफत प्रवेश प्रक्रिया राबवू, असे शिक्षण संस्थाचालकांचे म्हणणे आहे.
इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. १९ हजारांवर विद्यार्थी यंदा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. गत दोन वर्षांपासून शहरामध्ये केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन अकरावीची विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदासुद्धा माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शहरातील शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आम्हाला प्रवेश मिळत नाही. अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया करण्याचा अधिकार आम्हाला द्यावा, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिक्षण संस्थाचालकांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशाचे अधिकार दिले तर विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक होण्याची शक्यता आहे आणि प्रवेशपत्र विक्रीच्या नावाखाली संस्थाचालक लाखो रुपये विद्यार्थ्यांकडून गोळा करतात. एवढेच नाही, तर गुणवत्तेला महत्त्व देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, त्यांची आर्थिक लुबाडणूक होऊ नये, या दृष्टिकोनातूनच यंदासुद्धा शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु याला शिक्षण संस्थाचालक विरोध करीत आहेत. आठ दिवसांपूर्वी सर्व शिक्षण संस्थाचालकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची भेट घेऊन अकरावी प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली आणि प्रवेश प्रक्रिया राबविताना, विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्याचे शिक्षण संस्थाचालकांनी सांगितले. शिक्षण संस्थाचालकांची ही मागणी धुडकावून लावत, शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी केंद्रीय पद्धतीनेच अकरावीचे प्रवेश होतील. असे स्पष्ट केले.



अकरावी प्रवेशाबाबत शिक्षण संस्थाचालकांनी भेट घेऊन प्रवेशाचे अधिकार देण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला शिक्षण विभागाचा विरोध नाही; परंतु त्यांनी शासनाकडून अकरावी प्रवेशासाठी परवानगी आणावी, त्यानंतर त्यांनी प्रक्रिया राबवावी, शिक्षण विभागाच्यावतीने अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने; परंतु आॅफलाइन प्रक्रियेनेच होतील.
-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक, अकोला.

 

Web Title: Eleventh entrance process will be done in a central way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.