अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:17 PM2020-08-02T16:17:35+5:302020-08-02T16:17:43+5:30
विद्यार्थ्यांना लिंक देऊन मोबाइलवरच प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
अकोला: शहरातील शिक्षण संस्थाचालक अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध करीत असले तरी माध्यमिक शिक्षण विभागाने चौथ्या वर्षीसुद्धा अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीने आॅनलाइन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र वेबसाइट तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना लिंक देऊन मोबाइलवरच प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया राबविणे धोक्याचे आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या अध्यक्षतेखाली व प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत आॅनलाइन अकरावी विज्ञान शाखेची प्रक्रिया राबविण्याचे निश्चित करण्यात आले. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या एकूण ८ हजार ३00 जागा आहेत. या जागांवर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दहावी टक्केवारी, स्पोर्ट कोटा, माजी सैनिक कोटा, जातीनिहाय आरक्षण लक्षात घेऊन प्रवेश दिला जाणार आहे. एका लिंकद्वारे अकोल्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्याही केंद्रावर जाण्याची गरज नसून, दिलेल्या लिंकवर घरबसल्या मोबाइलवरून अर्ज भरता येणार आहे. वेबसाइटवर महाविद्यालयांच्या शुल्काची माहिती दिली जाणार आहे.
प्रवेश अर्ज भरताना, गुणपत्रिकेची झेरॉक्स, टीसी, बोनाफाइड प्रमाणपत्राची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, क्रीडा व कला नैपुण्य प्रमाणपत्र झेरॉक्स आदी कागदपत्रे लागणार आहेत. अर्ज भरताना विद्यार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीमध्ये अध्यक्ष डॉ. विजय नानोटी, सचिव गजानन चौधरी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, पुरूषोत्तम लांडे, आनंद साधू, प्रा. नरेंद्र लखाडे, प्रा. संजय देशमुख, प्रा. प्रकाश डवले, प्रा. प्रविण ढोणे, विनायक देशमुख, डॉ. साबिर कमाल, प्रा. विजय उजवणे, डॉ. जयंत बोबडे, गोपाल इंगळे, प्रा. बुंदेले, पंकज अग्रवाल यांचा समावेश आहे.