चाकूच्या धाकावर एमराल्ड कॉलनीतील कुटुंबाला लुटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:40 AM2017-11-16T02:40:29+5:302017-11-16T02:42:48+5:30
अकोला : अकोली खुर्द परिसरातील एमराल्ड कॉलनीतील एका घरामध्ये घुसून तिघा जणांना चाकूचा धाक दाखवून कुटुंबीयांकडून ५२ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोली खुर्द परिसरातील एमराल्ड कॉलनीतील एका घरामध्ये घुसून तिघा जणांना चाकूचा धाक दाखवून कुटुंबीयांकडून ५२ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या जागेवर नुकतेच रुजू झालेले ठाणेदार गजानन पडघन यांना चोरट्यांनी पहिली सलामी दिली.
अकोली खुर्द परिसरातील एमराल्ड कॉलनीमध्ये राहणारे नीलेश आत्माराम वानखडे (३३) हे मंगळवारी रात्री कुटुंबातील सदस्यांसह घरात झोपलेले होते. त्यांच्या घराच्या आवारभिंतीचे कुलूप आणि घराचा कडीकोयंडा तोडून तिघा चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात कुणीतरी घुसल्याची चाहूल वानखडे कुटुंबाला लागल्यावर सर्वजण जागे झाले. घरातील सदस्य जागे झाल्यामुळे आपल्या मनसुब्यावर पाणी फेरल्या जाईल, असे चोरट्यांना वाटले. चोरट्यांनी वानखडे कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवून सोने, रोख रक्कम कुठे आहे, याची विचारणा केली.
त्यानंतर चोरट्यांनी कपाटातील दहा ग्रॅम सोन्याची पोथ, कानातील रिंग पाच ग्रॅम, कानातील कर्णफुले पाच ग्रॅम, लहान मुलाच्या बोटातील अंगठी दोन ग्राम, एक ग्रॅमचे लॉकेट आणि रोख १२ हजार रुपये असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे घाबलेल्या नीलेश वानखडे यांनी जुने शहर पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. नीलेश वानखडे यांच्या तक्रारीनुसार जुने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल केला.
चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिक भयभीत
गत काही दिवसांपासून शहरातील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंगच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. शहरात चेनस्नॅचिंग घटना तर दररोजच घडत आहेत. यामुळे महिला, वृद्ध धास्तावलेले आहेत. महिलांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
सागर कॉलनीत ८६ हजारांची घरफोडी
वाशिम बायपास रोडवरील सागर कॉलनीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून ८६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. आकाश मनीराम वाकोडे (४३) हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील पर्समधील ६५00 रुपये रोख आणि नवी कोरी विनाक्रमांकाची ८0 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८६ हजार ५00 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणात बुधवारी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-