बाधीत कुटुंबांना तीन दिवसांत तातडीची मदत; पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण होणार! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By संतोष येलकर | Published: July 26, 2023 05:09 PM2023-07-26T17:09:09+5:302023-07-26T17:11:33+5:30
गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात जोरदार पाऊस बरसला असून, काही भागात अतिवृष्टीही झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, शेतजमीन खरडून गेली तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अकोला: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात घरांसह शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर घरांचे नुकसान झालेल्या जिल्हयातील बाधीत कुटुंबांपर्यंत येत्या तीन चार दिवसांत तातडीची सानुग्रह मदत पोहोचविण्यात येणार असून, शेती आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामेदेखिल तीन चार दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नवे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बुधवारी दिली. जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात जोरदार पाऊस बरसला असून, काही भागात अतिवृष्टीही झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, शेतजमीन खरडून गेली तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानीचे पंचनामे सुरु असून, त्यामध्ये घरांचे नुकसान झालेल्या बाधीत कुटुंबांना तातडीची सानुग्रह मदत तीन चार दिवसांत देण्यात येणार असून, पीक नुकसानीचे पंचनामेही पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी कुंभार यांनी सांगीतले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते.
पूरबाधीत क्षेत्राचा आराखडा सप्टेंबरपर्यत होणार तयार !
जिल्हयात नदी व नाल्यांना येणारे पूर आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांसाठी जिल्हयातील पूरबाधीत क्षेत्राचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत हा आराखडा तयार होणार असून, कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी करुन, पुढील वर्षीच्या पावसाळ्यापासून पुरामुळे जिल्हयात होणारे नुकसान टाळण्यास मदत होइल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शासकीय कामात अनियमितता खपवून घेतली जाणार नाही! -
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत व कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता आणि हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, योग्य ती कारवाइ करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला. आगामी वर्ष निवडणुकांचे राहणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा निधी व्यपगत होणार नाही, उपलब्ध निधीतून कामे मार्गी लागतील, या दृष्टीने योग्य खबरदारी घेवून काम करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.