लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप
By admin | Published: September 28, 2015 02:26 AM2015-09-28T02:26:31+5:302015-09-28T02:26:31+5:30
अवघे विघ्ने नेसी विलया..बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात अकोल्यात गणेशभक्तांनी बाप्पांना दिला निरोप.
अकोला : लाडक्या गणरायाच्या आगमनाने सर्वच भाविक सुखावून गेले होते. सतत दहा दिवस घरोघरी, मंडळांमध्ये बाप्पाची सरबराई सुरू होती. जणू एक प्रकारचा आनंदोत्सवच सुरू होता. रविवारी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. तेव्हा, भक्तीने ओतप्रोत झालेले मन भरून येत होते.. जड अंत:करणाने भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते.. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या..आणि आमची अवघी विघ्ने दूर करून पुन्हा या, अशी अपेक्षा व्यक्त करीत भाविकांनी बाप्पाचा निरोप घेतला. म् िगत दहा दिवसांपासून भक्तांच्या सान्निध्यात असलेल्या बाप्पाला रविवारी वाजतगाजत निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाईच्या गणपती पूजनाने जयहिंद चौकातून सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये पहिल्या स्थानी मानाचा बारभाई गणपती, द्वितीय स्थानावर राजराजेश्वर मंडळाचा गणपती, त्यानंतर जागेश्वर गणेश मंडळ, खोलेश्वर गणेश मंडळ, प्रगती गणेशोत्सव मंडळ, वीर हनुमान गणेश मंडळ, श्री नवयुवक गणेशोत्सव मंडळ रतनलाल प्लॉट, श्री गणेशोत्सव मंडळ, रजपूतपुरा आदी मंडळांसह शहरातील २८ प्रमुख मंडळे सहभागी झाली होती. मानाचा बारभाई गणेशाचे खासदार संजय धोत्रे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. रणधीर सावरकर, महापौर उज्ज्वला देशमुख यांनी पूजन केले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, माजी महापौर सुमन गावंडे, मदन भरगड, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, विजय जयपिल्ले, अँड. सुभाषसिंह ठाकूर, नीरज शाह उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबतच शहरात हजारो घरांमध्ये आस्थेने स्थापना करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन गणेश घाटावर भाविकांनी केले. मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर मानाच्या गणपती मंडळांच्या पाठोपाठ येणार्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जयहिंद चौकात क्रमांक देण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीकडे मिरवणुकीत सहभागी झालेल्या १७ मंडळांसह ५ आखाड्यांची अधिकृत नोंदणी होती. काही मंडळांनी नोंदणी न करताच मिरवणुकीत सहभाग घेतल्याने प्रत्यक्षात मंडळांची संख्या त्यापेक्षा अधिक झाली. पहिल्या गणेशाचे विसर्जन सायंकाळी ६.१0 वाजता झाले.