वृक्षसंवर्धनासाठी झाडांसोबत भावनिक नाते गरजेचे! - ए. एस. नाथन
By Atul.jaiswal | Published: July 13, 2019 05:45 PM2019-07-13T17:45:44+5:302019-07-13T17:46:02+5:30
वलेल्या प्रत्येक झाडासोबत भावनिक नाते-सबंध जोडले, तरच ते झाड जगण्याची शक्यता अधिक असते आणि यामाध्यमातूनच वृक्षसंवर्धन मोहिमा यशस्वी होऊ शकतात.
- अतुल जयस्वाल
अकोला : पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज असून, लावलेल्या प्रत्येक झाडासोबत भावनिक नाते-सबंध जोडले, तरच ते झाड जगण्याची शक्यता अधिक असते आणि यामाध्यमातूनच वृक्षसंवर्धन मोहिमा यशस्वी होऊ शकतात, असे मत भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मुळचे तामिळनाडू राज्यातील व गत पाच वर्षांपासून अकोल्यात राहून राज्यभर वृक्षसंवर्धनासाठी झटत असलेल्या ए. एस. नाथन यांच्याशी साधलेला संवाद....
प्र. वृक्षसंवर्धन मोहिमेकडे कसे व कधी वळलात ?
नाथन : बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरचा ºहास होत आहे. वृक्षतोड मानवाच्या मुळावर उठत आहे. झाडे जगली तरच मानवाचे अस्तित्व टिकेल असा विचार मनात आला. तसेच झाडांची सेवा ही इश्वराची सेवा करण्यासारखे असल्याचे माझे ठाम मत आहे. यातूनच वर्ष २०११ मध्ये वृक्षसंवर्धनासाठी काम करण्यास सुरुवात केली. यासाठी राज्यभर फिरून संशोधन केल्यानंतर भारत वृक्ष क्रांती संघटनेची स्थापना केली.
प्र. वृक्षसंवर्धनासाठी अकोला जिल्ह्याची निवड कशी केली?
नाथन : रोजगाराच्या शोधार्थ २००७ मध्ये मुंबई येथे आलो व तेथे चित्रपटसृष्टीत मिळेल ते काम केले. त्यानंतर वृक्षसंवर्धनासाठीच्या एका उपक्रमाबाबत मंत्रालयात गेलो असता तेथे परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची भेट झाली व त्यांनी अकोल्यात येण्याची गळ घातली. तेव्हापासून अकोल्यात वृक्षसंवर्धनाचे प्रयोग राबवित आहे.
प्र. आतापर्यंत कोण-कोणते उपक्रम राबविले?
नाथन : महाराष्ट्रात वृक्षसंवर्धनाची सुरुवात ‘एक दाखला-एक झाड’ या उपक्रमाने केली. यानंतर ‘एक विवाह-एक झाड’हा उपक्रमही लागू करावा, यासाठी प्रयत्न केले. ‘एक जन्म - एक झाड’ व ‘एक विद्यार्थी - एक झाड’ हे दोन उपक्रम अकोला पॅटर्न म्हणून राज्यभरात लागू करण्यात यशस्वी होऊ शकलो. ‘एक जन्म - एक झाड’ या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने हजारो झाडे लावण्यात आली आहेत.
प्र. सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबद्दल काय सांगाल ?
नाथन : शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी वृक्षारोपण मोहिम स्तुत्यच आहे. या मोहिमेअंतर्गत लावण्यात येणाऱ्या झाडांसोबत मानसांची भावनिक सांगड घालण्याची गरज आहे. मानवी वस्त्यांमध्ये मनुष्याला उपयोगी अशा झाडांचे रोपण केल्यास ती झाडे जगण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गावांमध्ये आंबा, चिंच, बेल यासारखी फळझाडे लावणे गरजेचे आहे. जंगलांमध्ये वड, पिंपळ यासारखी मोठी झाडे लावणे गरजेचे आहे.